पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:48+5:302021-05-01T04:06:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला शिकणार्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला शिकणार्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. कैवल्य योगेश काठे (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
जयहिंद नगरात कैवल्यचे निवासस्थान आहे. त्याचे वडील शिक्षक असून, आई गृहिणी आहे. त्याला एक बहीणही आहे. कैवल्यच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली आहे. तो पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला शिकत होता. तो नेहमी मोबाईलमध्ये गुंतून राहायचा. ऑनलाईन क्लासेस करत असावा, असे समजून पालकही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. सोमवारी दुपारी ४च्या सुमारास तो अशाचप्रकारे मोबाईलमध्ये गुंतलेला होता. आई भारतीसोबत त्याचे बोलणे झाले. अर्ध्या तासानंतर त्याचा आवाज येत नसल्यामुळे आईने बेडरूममध्ये डोकावले असता, कैवल्य गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. आईने आरडाओरड करून आजूबाजूच्यांना गोळा केले. त्यानंतर कैवल्यला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. कैवल्यची आई भारती काठे (वय ४२) यांनी दिलेल्या माहितीवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---
कुटुंबियांना मानसिक धक्का
कैवल्यने उचललेल्या या आत्मघाती पावलामुळे त्याच्या कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याचा शोध आम्ही घेत आहोत, असे मानकापूरच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी सांगितले.
---