पुनम नागरी सहकारी पतसंस्थेला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:51+5:302021-07-12T04:06:51+5:30
नागपूर : पुनम नागरी सहकारी पतसंस्थेला एका प्रकरणामध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका बसला. आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या ...
नागपूर : पुनम नागरी सहकारी पतसंस्थेला एका प्रकरणामध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका बसला. आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या ९ लाख ९८ हजार ३७७ रुपयाच्या दोन मुदत ठेवी १० टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश पतसंस्थेला दिला. व्याज १४ फेब्रुवारी २०१९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. याशिवाय ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कम पतसंस्थेनेच द्यायची आहे.
आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्या पीठाने हा निर्णय नुकताच दिला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पतसंस्थेला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. विक्रांत काटेकर असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी १६ ऑगस्ट २०१८ रोजी पुनम नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ६ लाख ५८ हजार व ३ लाख रुपये मुदत ठेवीत गुंतवले होते. त्यानंतर त्यांना ही रक्कम परत करण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने त्यांना दिलासा देताना पतसंस्थेने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे परखड निरीक्षण नोंदवले.