नागपुरात पूनम मॉलची भींत पडून चौकीदार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 08:58 PM2019-08-17T20:58:57+5:302019-08-17T21:05:12+5:30
वर्धमाननगरातील आयनॉक्स पूनम मॉलची भींत आणि सज्जा पडून चौकीदारी करणा-या एका वृद्धाचा करुण अंत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धमाननगरातील आयनॉक्स पूनम मॉलची भींत आणि सज्जा पडून चौकीदारी करणा-या एका वृद्धाचा करुण अंत झाला.
जयप्रकाश रामनाथ शर्मा (वय ६४, रा. हिवरीनगर) असे मृताचे नाव आहे. तर, भींतीच्या मलब्याखाली दबून एका महिलेसह तिघे जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी पूनम मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सदोष बांधकामामुळे पूनम मॉलच्या भींतींना पाझर सुटला आहे. परिणामी एक भींत जीर्ण झाली होती. ती कधीही पडू शकते आणि अपघात होऊन कुणाचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असूनही पूनम मॉलच्या मालकाने तसेच व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शुक्रवारी रात्री ११. ४५ च्या सुमारास जीर्ण झालेली भींत आणि सज्जा कोसळला. यावेळी तेथे जयप्रकाश शर्मा चौकीदारी करीत होते. त्यांच्या अंगावर विटा-सिमेंटचा मलबा पडल्याने ते ठार झाले. तर, मुक्ताबाई रामभाऊ गजभिये (वय ५०, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) आणि अन्य दोघे जबर जखमी झाले. दरम्यान, मॉलची भींत पडल्याने आणि अन्य भींतींना मोठमोठे तडे गेल्याचे कळाल्याने मॉल समोर नागरिकांनी एकच गर्दी केली. माहिती कळताच लकडगंज पोलीस तसेच अग्निशमन दलाचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी लगेच बचावकार्य सुरू करून शर्मा आणि मलब्याखाली फसलेल्यांना बाहेर काढले. त्यांना मेयोत हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी शर्मा यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मध्यरात्रीपासून मॉलसमोर प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस, अग्निशमन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनीही धाव घेतली. पोलिसांनी संतप्त जमावाला पांगविले. त्यानंतर पहाटेपर्यंत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या. दरम्यान, गुड्डू जयप्रकाश शर्मा (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी पूनम मॉलचे मालक तसेच देखभालीची जबाबदारी असणारांवर कलम ३०४, ३३७, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
मोठा अनर्थ टळला
ही दुर्घटना मध्यरात्री घडली म्हणून मोठा अनर्थ टळला. दिवसा ही घटना घडली असती तर मृतकांची तसेच जखमींची संख्या जास्त असती.