त्याच्या संपत्तीच्या मोहात गरीब शेतकऱ्याचा नाहक बळी गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:12+5:302021-07-22T04:07:12+5:30

उमरेड/भिवापूर : संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हेरायचे, पकडायचे आणि मातीमोल भावात सौदेबाजी करायची, असा गोरखधंदा उमरेड उपविभागात चांगलाच फोफावला आहे. ...

The poor farmer fell prey to the temptation of his wealth | त्याच्या संपत्तीच्या मोहात गरीब शेतकऱ्याचा नाहक बळी गेला

त्याच्या संपत्तीच्या मोहात गरीब शेतकऱ्याचा नाहक बळी गेला

googlenewsNext

उमरेड/भिवापूर : संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हेरायचे, पकडायचे आणि मातीमोल भावात सौदेबाजी करायची, असा गोरखधंदा उमरेड उपविभागात चांगलाच फोफावला आहे. त्यातही थोडक्या रकमेवर भरमसाट व्याज आकारणी करीत शेतजमीन गिळंकृत करायची, असेही लुबाडणुकीचे प्रकार या विभागात यापूर्वी उजेडात आले आहेत. अशाच प्रवृत्तीतून भिवापूर तालुक्यातील सरांडी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणाकडे बघितले जाते. सरांडी येथील रोशन काशीनाथ येले (३३) या शेतकऱ्याच्या आत्महत्येस उमरेड येथील प्रमोद लाला भोयर (३४) या सावकारास कारणीभूत असल्याचे सिद्ध झाल्यावर सत्र न्यायालयाने सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा आढावा घेतल्यास आरोपी प्रमोद भोयर पैसा आणि संपत्तीच्या मोहमायात किती खोलवर अडकला होता, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

सत्ता, मोह, पैसा, संपत्ती अवतीभवती वास करू लागल्या की, अनेकांना लवकर ‘उकळ्या’ फुटतात आणि मग जीवनाचा मार्ग भरकटतो असे म्हणतात. नेमके असेच काहीसे प्रमोद भोयर याच्यासोबत झाले असावे, असे आता बोलले जात आहे.

एका छोट्याशा हेवती या गावात वास्तव्यास असलेला प्रमोद भोयर शेतकरी कुटुंबातील आहे. एक शेतकरी, प्रॉपर्टी डीलर ते सावकारी धंदा असा जीवनक्रम आणि यातून गडगंज संपत्तीची मालकी प्रमोदने अल्पावधीतच जमविली उमरेड तालुक्यातील हेवती येथे.

आरोपी प्रमोद भोयरकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. ही शेतजमीन मकरधोकडा क्रमांक ३ या कोळसा खदान प्रकल्पात २०१५-१६ च्या दरम्यान अधिग्रहित झाली. या मोबदल्यात प्रमोदच्या वाट्याला मोठी रक्कम आली. हेवती सोडले. उमरेड गाठले. प्रमोदचे जीवनचक्र बदलले. पैशातून पैसा, व्याजाचा धंदा आणि सोबतीला जमीन, शेतजमीन खरेदी-विक्रीचा सपाटा त्याने काही मित्रांच्या मदतीने विभागात सुरू केला. शेतजमिनीच्या सौदेबाजीत प्रमोद चांगलाच गुंतला. यातूनच बहुसंख्य प्रकरणात पैशाच्या व्यवहारावरून वाद झालेत. अनेक ठिकाणी विवाद वाढत गेले. अनेक प्रकरणे उमरेड, भिवापूर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. या संपूर्ण प्रकरणावरून प्रमोद पैसा-संपत्तीच्या चक्रव्यूहात चांगलाच गुरफटून गेल्याचे बोलले जात आहे. अशातच रोशन येले या शेतकऱ्याच्या पाच एकर शेतजमिन विकण्याचा करार प्रमोदने केला होता. अत्यंत कमी रकमेत, मातीमोल भावात आपली जमीन गमावण्याच्या चिंतेने १३ मार्च २०१८ रोजी विषारी औषध प्राशन करून रोशन येले यांनी आपली जीवनयात्रा संपविली. काल मंगळवारी प्रमोद भोयर याला सत्र न्यायालयाने भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत ७ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. याशिवाय आरोपीला भादंविच्या कलम ५०६ (ठार मारण्याची धमकी देणे) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. या संपूर्ण घटनाक्रमामुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर निदान रोशन येलेसारख्या शेतकऱ्याचा बळी जाणार नाही, अशी भावना सरांडी येथील शेतकरी रवी मलवंडे यांनी व्यक्त केली. अशाप्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: The poor farmer fell prey to the temptation of his wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.