रंगूनवालाचा गरिबांना चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:28 AM2017-09-10T01:28:48+5:302017-09-10T01:28:59+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोरगाव येथे अस्तित्वात नसलेले भूखंड विकून १३० ते १४० भूखंडधारकांना कोट्यवधी रुपयांनी फसवल्याचा आरोप असलेल्या रंगूनवाला याला ....
राहुल अवसरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोरगाव येथे अस्तित्वात नसलेले भूखंड विकून १३० ते १४० भूखंडधारकांना कोट्यवधी रुपयांनी फसवल्याचा आरोप असलेल्या रंगूनवाला याला तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने जबरदस्त दणका दिला. त्याला कोणताही दिलासा न देता त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
अब्दुल अजीज अब्दुल शकूर रंगूनवाला (७१), असे या आरोपीचे नाव असून तो काटोल रोडवरील राजनगरच्या सोएल मंझिल येथील रहिवासी आहे. पीडित भूखंडधारक हमीदखान अहमदखान यांच्या तक्रारीवरून आरोपीची ही बनवाबनवी उजेडात आली.
रंगूनवाला याने मौजा बोरगाव येथील ३.५० एकर जमीन रजिस्टर्ड खरेदीपत्राद्वारे चंदन नगरारे आणि इतरांकडून विकत घेतली होती. समाजभूषण सोसायटी स्थापन केली. तो या सोसायटीचा सचिव झाला. त्याने ३.५० एकर जागेचा गैरफायदा घेत प्रत्यक्षात १० एकर जागेवर ले-आऊट पाडून ते २०० भूखंडधारकांना विकले आणि १३०-१४० भूखंडधारकांची फसवणूक केली आहे.
हमीदखान अहमदखान यांनी या ले-आऊटमधील १४३ ए क्रमांकाचा १२०० चौरस फुटाचा भूखंड रंगूनवालाकडून आपली पत्नी सायराबानो यांच्या नावे खरेदी केला होता. या भूखंडाची रजिस्ट्री ३१ आॅक्टोबर १९९२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ७ येथे केली होती. आरोपीने हाच भूखंड आणखी दोन जणांना विकल्याचे समजल्यावरून हमीदखान यांनी त्याला जाब विचारला होता.
त्याने आपली चूक मान्य केली होती आणि दुसरा भूखंड देतो, असे त्यांना सांगितले होते. त्याने हमीदखान यांच्याकडून २ हजार रुपये घेऊन ६ मे १९९५ रोजी रजिस्टर्ड दुरुस्तीपत्र करून ‘१४३ एच’ हा भूखंड दिला होता. आरोपीने हा भूखंड सोसायटीच्या मोकळ्या जागेवर दाखवून ताबापत्र दिले होते. मात्र कोणतेही मार्किंग करून दिले नव्हते. २००० मध्ये हमीदखान यांनी हा भूखंड विक्रीस काढला. तो ले-आऊटमध्ये दिसून आलेला नव्हता. आपणास अस्तित्वात नसलेला भूखंड विकून फसवणूक समजातच त्यांनी रंगूनवालाच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्याने धमकी देऊन भूखंड देण्यास नकार दिला होता. त्यांच्या तक्रारीवरून रंगूनवाला याच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक करीत असता रंगूनवाला याचे मोठे घबाड या पथकाला आढळून आले. आरोपी रंगूनवाला याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील लीलाधर घाडगे यांनी काम पाहिले.
या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. पाटील हे आहेत.