मुकी बिचारी, कुणीही हाकू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:51+5:302021-08-17T04:12:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील सिमेंट रोडवर जागोजागी मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात वा कमी प्रकाशात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सिमेंट रोडवर जागोजागी मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात वा कमी प्रकाशात रोडवर बसणाऱ्या जनावरांमुळे अपघात वाढले आहेत. यात निरपराध लोकांचे बळी जात आहेत. जनावरे बिचारी मुकी आहेत. पण कुणीही हाकू नका. ती रस्त्यावरच फिरायला सोडली आहेत, अशीच भूमिका पशूपालकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
शहरातील सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात मोकाट जनावरांची समस्या आहे. हुडकेश्वर रोड, म्हाळगीनगर, वैशालीनगर, तुकडोजी पुतळा ते मानेवाडा रोड, हिंगणा रोड, जयताळा, पारडी, दिघोरी, सक्करदरा, काटोल रोड, कॉटन मार्केट या भागात फेरफटका मारला असता, जागोजागी मोकाट जनावरे रोडवर बसलेली आढळून येतात.
जनावरे मोकाट सोडण्याच्या प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु कठोर कारवाई होत नसल्याने मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट गुरांना पकडण्यासाठी मनपाच्या कोंडवाडा विभागाद्वारे कारवाई केली जाते. परंतु मनुष्यबळ व वाहनांचा अभाव असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. विभागाकडे दोन ट्रॅक्टर ट्रॉली आहेत. अनेकदा जनावरे पकडल्यानंतर मालकांना दंड आकारून जनावरे सोडली जातात. ती पुन्हा मोकाट सोडली जातात. अपघाताचा धोका असल्याने मोकाट जनावरांना मनपा प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी अॅड. अक्षय समर्थ यांनी केली आहे.
...
पावसाळ्यात समस्या गंभीर
पावसाळ्याच्या दिवसात गोपालक जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडतात. ती रस्त्यावरील कोरड्या जागेत बसतात. सिमेंट रोडवर ठिकठिकाणी मोकाट जनावरे बसलेली असतात. रात्रीलाही जागोजागी जनावरे बसलेली असतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
....
व्यापक कारवाईची गरज
कोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई केली जाते. परंतु ती मर्यादित असते. शहरातील विविध भागात यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे. परंतु विभागाकडे यासाठी सक्षम यंत्रणा नाही. मनपा प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.
...
शहरात हजाराहून अधिक गोठे
नागपूर शहरात १०५० गोठे आहेत. यातील निम्मे अनधिकृत आहेत. वर्दळीच्या भागातही गोठे असून, मोकाट जनावरांची समस्या आहे. काही भागात गोठे चालकांची दादागिरी चालते. यामुळे मनपाचे कर्मचारी कारवाईला घाबरतात. अनेकदा नगरसेवकही अशा कारवाईला विरोध करतात.
...
मोकाट गुरे पकडण्याची मोहीम
मनपाच्या कोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जाते. मागील सहा वर्षांत ६,५०० मोकाट गुरे पकडली. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर बेवारस हजाराहून अधिक गुरे गोरक्षणला दान दिली. पावसाळ्यात मोकाट जनावरांची समस्या अधिक असते. याला आळा घालण्याचा प्रयत्न आहे.
डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी मनपा