पीओपी बाप्पा : मनपा प्रशासन झोपले आहे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 09:39 PM2019-08-28T21:39:31+5:302019-08-28T21:45:08+5:30
महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस(पीओपी)’च्या मूर्ती विक्रीस बंदी घातली गेली आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने, मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण संरक्षणाची बोंब ठोकायची, उपाययोजना करायच्या आणि कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करीत असल्याचा बनाव करायचा... एवढ्याच गोष्टी स्थानिक प्रशासन व्यवस्थेकडून सातत्याने कानावर पडत असल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात स्वत:च केलेल्या कायद्याला बगल देण्याचा प्रताप प्रशासनिक व्यवस्थेचे कर्मचारी करीत असल्याचे उघड उघड दिसून येते. महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस(पीओपी)’च्या मूर्ती विक्रीस बंदी घातली गेली आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने, मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांकडून पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या पीओपी मूर्तींना बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. त्यावर बरेच वर्षे राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्थेमध्ये चर्चा-चिंतन करण्यात येऊन गेल्या वर्षीपासून शहरात केवळ मातीच्याच मूर्ती विकल्या जातील, असा आदेश काढण्यात आला. शिवाय, पीओपी मूर्तींना शहरात प्रवेशच दिला जाणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या. मात्र, या दोन्ही आदेशांना विक्रेत्यांनी केराची टोपली दाखविली असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. शिवाय, अशा मूर्ती जप्त केल्या जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, हे सगळे बोलणे कार्यालयातील दस्तऐवजामध्येच अंकित केले जाते की काय... असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या चितारओळीमध्ये काही चार-पाच पारंपरिक मूर्तिकार वगळता इतर हंगामी व्यावसायिकांनी भाड्याच्या दुकानांमध्ये महापालिकेच्या नाकावर लिंबू टिच्चून पीओपीचा बाजार भरवला असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. विशेष म्हणजे, या मूर्तींना मातीची किंवा पीओपीची अशा सूचना चिकटवण्यात आलेल्या नाही. बिच्चारा भाविक बाप्पावरील श्रद्धेपाटी सुबक, सुरेख आणि त्याच्या मनातील भाव अंकित करणाऱ्या मूर्ती मातीच्या म्हणून खरेदी करण्यावर भर देत आहेत. जेथे स्वत: प्रशासनच बेकायदेशीर गोष्टींना अभय देत आहे, तेथे सामान्य नागरिकांकडून कायदा पाळला जाईल.. अशी अपेक्षा प्रशासनाने तरी कशी करावी, हा प्रमुख प्रश्न आहे.
हंगामी व्यावसायिक मज्जेत अन् पारंपरिक कलावंत मूर्च्छितावस्थेत!
चितारओळीमध्ये जेवढी घरे तेवढेच मूर्तिकार असा समज आहे. त्यातील काही मूर्तिकार स्वत: माती आणून किंवा कुंभारांकडून बनविलेल्या मातीच्या मूर्ती आणून पारंपरिकरीत्या मूर्तींची विक्री करतात. मात्र, जे मूर्तिकार नाहीत, त्यांच्या घरी असलेल्या मोकळ्या जागेत भलीमोठी रक्कम घेऊन दहा दिवसांसाठी हंगामी मूर्ती व्यावसायिकांना ती जागा देत असतात. याच जागेमध्ये हे हंगामी व्यावसायिक पीओपी मूर्तींची सर्रास विक्री करीत असल्याचे दिसून येते. यामुळे मात्र पारंपरिक मातीकला जोपासणाऱ्या कलावंतांची स्थिती मूर्च्छितावस्था आल्यासारखी झाल्याचे दिसून येते.
कारवाई कधी करणार?
गेल्या काही वर्षांपासून पीओपीची मूर्ती नको अन्यथा कारवाई, असा आदेश महापालिका प्रशासनाकडून काढला गेला आहे. दरवर्षी श्रीगणेशोत्सवाच्या काळात कारवाई केली जात असते. तरीदेखील पीओपी मूर्तींची विक्री थांबलेली दिसत नाही. उलट, दरवर्षी नवनव्या विक्रेत्यांची भर पडत असून, सर्व विक्रेते बाहेरून आलेल्या पीओपीच्या आयातीत मूर्तींची सर्रास विक्री करीत असल्याचे स्पष्ट होते. यावरून प्रशासन स्वत:च कारवाईसाठी उदासीन असून, स्वत:च केलेला कायदा पाळण्यास असमर्थ दिसून येत आहे.