लोकसंख्या ३५ लाख, खाटा केवळ २८३७; नागपुरात कोरोना नियोजन ढेपाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 09:27 AM2020-09-15T09:27:49+5:302020-09-15T09:28:11+5:30
शहरात सध्याच्या स्थितीत शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये १२५० तर खासगीमध्ये १५८७ अशा एकूण २८३७ खाटा उपलब्ध आहेत. तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.
सुमेध वाघमारे/ गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. रोज १५०० ते २००० हजारावर रुग्णांची भर पडत आहे. परंतु गेल्या सात महिन्यात वैद्यकीय सेवांना घेऊन प्रशासनाकडून ठोस नियोजनच झाले नाही. परिणामी, गंभीर रुग्णांवरही भटकंतीची वेळ आली आहे. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सध्याच्या स्थितीत शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये १२५० तर खासगीमध्ये १५८७ अशा एकूण २८३७ खाटा उपलब्ध आहेत. तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.
नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. या महिन्यात के वळ १६ रुग्णांची नोंद होती. एप्रिल महिन्यात दोन मृत्यू, १३८ रुग्ण होते. मे महिन्यात ५४१ रुग्ण, ११ मृत्य होते. जून महिन्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. १५०५ रुग्ण व १५ रुग्णांचा जीव गेला. जुलै महिन्यात ५३९२ रुग्ण व ९८ मृत्यू होते तर ऑगस्ट महिन्यात २९५५५ रुग्ण ९१९ मृत्यूची नोंद झाली. तज्ज्ञांनुसार या कालावधीत प्रशासनाने किमान एक हजार खाटा ऑक्सिजनच्या व ५०० खाटा आयसीयूच्या के ल्या असत्या तर आज खाटांसाठी धावाधाव दिसली नसती.
६२ नव्हे ३७ खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार
प्रशासनाने ६२ खासगी रुग्णांलयात कोविड रुग्णांवर उपचार उपलब्ध करण्याचा दावा केला होता. दोन हजारांवर खाटा उपलब्ध होतील, अशी घोषणाही के ली. परंतु प्रत्यक्षात ३७ खासगी हॉस्पिटलमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होऊ शकले. १०० टक्के खाटा मिळविण्यास प्रशानाला यश आले नाही. यामळे सध्याच्या स्थितीत खासगीच्या केवळ १५८७ खाटा रुग्णसेवेत आहेत.
खासगीचे शुल्क न परडवणारे
शासनाने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खासगीमध्ये प्रतिदिवस ४०००, मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी ७५०० तर गंभीर रुग्णांसाठी ९५०० रुपयांचे दर ठरवून दिले आहेत. परंतु याच्यामध्ये महागडी औषधे, इंजेक्शन, रक्ताच्या महागड्या तपासण्या, सीटी स्कॅन, सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची व्हिझिट व पीपीई किटचा खर्च रुग्णांना करावा लागतो. यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा १४ दिवसांचा खर्च सुमारे एक ते दीड लाखांच्या घरात जातो. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांचा खर्च १ लाख ९० हजार ते २ लाख ३५ हजारांपर्यंत जातो तर गंभीर रुग्णांचा खर्च हा साडेचार ते साडेपाच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असते. यातच बहुसंख्य हॉस्पिटल रुग्ण भरती करण्यापूर्वीच एक ते दोन लाख अॅडव्हान्स जमा करण्यास लावत असल्याने हा खर्च गरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे.
मेयो, मेडिकलच्या १२०० खाटा मर्यादित
मेयोने आपल्या सर्जिकल कॉम्प्लेक्सचे रूपांतर ६०० खाटांच्या डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये केले आहे. यांच्याकडे आता दुसरी सोय नाही. नॉनकोविडच्या रुग्णांसाठी केवळ २५० खाटा शिल्लक आहेत. मेडिकलने आपले ट्रॉमा केअर सेंटरसह इतर वॉर्डाला कोविड हॉस्पिटलचे स्वरूप देत ६०० खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. उर्वरित १६०० खाटांवर नॉनकोविडच्या रुग्णांवर उपचार केला जात आहे. विशेष म्हणजे, दिवसेंदिवस हे रुग्ण वाढत आहे. यामुळे या दोन्ही रुग्णालयात कोविडच्या खाट वाढविणे शक्य नसल्याचे चित्र आहे.
खाट रिकामी असताना न दिल्यास कारवाई
खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध खाटा व रिकाम्या खाटांची माहिती म्हणजे ‘डॅशबोर्ड’ लावणे आवश्यक आहे. असे न झाल्यास संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावली जाईल. तसेच खासगी रुग्णालयात खाट रिकामी असतानाही कोरोना रुग्णांना खाट उपलब्ध न केल्यास संबंधित हॉस्पिटलवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, मनपा
नर्र्सिंग होममध्येही कोविडवर उपचार सुरू व्हावेत. कोविड रुग्णांची भयावह पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे. प्रत्येक रुग्णावर संशयित म्हणूनच उपचार के ले जात आहे. यामुळे छोटे हॉस्पिटल व नर्सिंग होमनेही कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात करायला हवी. शासनाने तशी परवानगी द्यायला हवी. यामुळे गरजू रुग्णांवर तातडीने उपचार होऊ शकतील.
-डॉ. अनुप मरार, संयोजक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन