नागपूरच्या पोरी हुश्शार...
By admin | Published: May 31, 2017 02:44 AM2017-05-31T02:44:04+5:302017-05-31T02:44:04+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे.
बारावी निकाल तिन्ही शाखांत विद्यार्थिनींचाच वरचष्मा, यंदाही यशोशिखर कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याप्रमाणेच नागपूर विभागातदेखील विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांतील गुणवंतांमध्ये मुलींचाच जास्त भरणा आहे. कला व वाणिज्य शाखेत विद्यार्थिनींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आनंद जवादे याने ९८.१५ टक्के (६३८) गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला. त्याच्यापाठोपाठ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अस्मिता मस्के हिने ९७.८४ टक्के (६३६) गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. तिसऱ्या क्रमांकावर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी दुर्गेश अग्रवाल व सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा तन्मय शेंडे हे दोघे आहेत. त्यांनी ९७.२३ टक्के (६३२) गुण मिळविले आहे.
वाणिज्य शाखेत कमला नेहरू महाविद्यालयाची अंजली शहा हिने ९६.७६ टक्के (६२९) गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ९५.५ टक्के (६२५) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा ऋषी काकडे हा विद्यार्थी आहे. याच महाविद्यालयाची शिवानी पारधी हिने ९३.८५टक्के (६१०) गुणांसह तिसरे स्थान पटकाविले.
कला शाखेत मुलींचाच वरचष्मा असून ‘एलएडी’ महाविद्यालयाची जुई सगदेव व हिस्लॉप महाविद्यालयाचा अनिस बन्सोड यांनी अनुक्रमे ९४.७६ टक्के (६१६) व व ९२.७६ (६०३) गुण मिळवित प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ९२.४६ टक्के (६०१) गुणांसह हिस्लॉप महाविद्यालयाची शर्वरी जळगावकर ही आहे. नागपूर जिल्ह्यातून दिव्यांगांमधून एलएडी महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी दिविजा सुतोणे ही ८८.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ‘एमसीव्हीसी’तून कमला नेहरू महाविद्यालयाच्या अश्विनी पराळे हिने ७९.०७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला.
नागपूर विभागातून ८५.६८० पैकी ७८,७९५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.९६ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ३४,१६७ पैकी ३१,७४३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९२.९१ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.०९ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ९६.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.५४ टक्के इतका राहिला.