नागपूरच्या पोरी हुश्शार
By admin | Published: May 29, 2016 02:55 AM2016-05-29T02:55:36+5:302016-05-29T02:55:36+5:30
‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले.
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले. निकालांमध्ये यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. उपराजधानीत ‘सीबीएसई’च्या सुमारे ५० शाळा असून यातील जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सुरुवातीला गुणांऐवजी ‘ग्रेड’वर आधारित निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे निकाल पाहताना पालक व विद्यार्थ्यांसोबतच शाळांमध्येदेखील संभ्रम निर्माण झाला होता. परंतु काही तासांनी शाळांकडे विद्यार्थ्यांचे गुण आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले.नारायण विद्यालयम्चा श्रेयस गाडगे याने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली असली तरी गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. नागपूरच्या सेंटर पॉईंट शाळेची विद्यार्थिनी अमिषा केळकर, नारायणा विद्यालयाचा हितेश कांडला व झेव्हिअर्स स्कूल, हिंगणा रोड येथील विद्यार्थी शुभंकर बॅनर्जी हे ९९.४ टक्के (४९७) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नारायणा विद्यालयाचे शिवम चौबे, तृषा साखरकर व भवन्स विद्यामंदिर, आष्टी येथील दीक्षा पांडे हे संयुक्तरीत्या तिसरे आहेत. या तिघांनाही ९९.२ टक्के (४९६) गुण प्राप्त झाले. (प्रतिनिधी)
‘सीजीपीए’मध्येदेखील विद्यार्थिनींचीच बाजी
नागपुरातील ह्यसीबीएसईह्णच्या बहुतेक सर्व शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे १० ह्यसीजीपीए’ म्हणजेच सर्वोत्तम ‘ग्रेड’ असलेल्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त आहे. विविध शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘सीजीपीए’ १० आहे.
विद्यार्थ्यांची धावपळ
नागपुरातील सीबीएसई शाळा चेन्नई विभागाच्या अंतर्गत येत असल्याने निकालाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. निकालाची माहिती समजतात विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये विचारपूस करण्यास सुरुवात केली . मोबाईलवर एसएमएसने निकाल पाहण्याची सुविधा नसल्याने अनेकांनी तर आधी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. बाहेरगावी असलेल्यांनी इतर मित्रांकडून निकाल काय हे माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला.