पोेर्टेबल ऑक्सिजन यंत्राची नागपूर जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:50 PM2020-09-28T12:50:23+5:302020-09-28T12:51:35+5:30
व्यावसायिक स्तरावर हॉस्पिटलला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर मोठे असते. पण क्वारंटाईन असलेले वा नसलेल्या लोकांना आता घरगुती स्तरावर ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे पोर्टेबल कॅनला मागणी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर कोरोना रुग्णांसाठी घरगुती स्तरावर ६ ते १२ लिटर क्षमतेचे पोर्टेबल ऑक्सिजन यंत्र अर्थात मिनी ऑक्सिजन सिलिंडर कॅनची मागणी वाढली आहे. हे सिलिंडर दोन महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. लोक आरोग्यप्रति सजग झाल्याने आणि मागणी वाढल्याने जिल्ह्यात कोटीची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
व्यावसायिक स्तरावर हॉस्पिटलला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर मोठे असते. पण क्वारंटाईन असलेले वा नसलेल्या लोकांना आता घरगुती स्तरावर ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे पोर्टेबल कॅनला मागणी वाढली आहेत. हे कॅन मुंबई, दिल्ली आणि अन्य राज्यातून नागपुरात विक्रीला येत आहे. विक्रेते शरीरातील ऑक्सिजनचा स्तर मोजण्याच्या यंत्रासह ऑक्सिजन कॅनची विक्री करीत आहेत. मागणी वाढल्याने कॅनचा तुटवडा होऊ लागला आहे. याशिवाय ऑनलाईन स्तरावर लोकांकडून मागणी वाढली आहे. जिल्ह्यात १० हजारांच्या आसपास ऑक्सिजन कॅनची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अनेक सामाजिक संस्था ऑक्झिमीटरसोबत कॅनचे वितरण करीत आहेत. दिल्ली आणि मुंबई येथील कंपन्यांनी कॅनचे उत्पादन वाढविले आहे. त्याचा दर्जाही चांगला आहे. ऑक्सिजन कॅनचा उपयोग कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक विक्रेते घरी येऊन देत आहेत. सहज नेता येणारी आणि घरगुती वापराच्या कॅनला लोकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. त्या प्रमाणात पुरवठाही वाढला आहे.
डॉ. प्रसाद वरदळकर म्हणाले, सद्य स्थितीत रुग्णालयात उपचाराचा खर्च वाढला आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने आणि होम क्वारंटाईन असणारे रुग्ण या पोर्टेबल ऑक्सिजन कॅन आणि ऑक्झिमीटरचा उपयोग करीत आहेत. कॅन वापरणे सोपे असून सहजपणे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. याच्या उपयोगाची पद्धत अत्यंत सोपी आहे. अनेकांची तब्येत सुधारल्याचे दिसून आले आहे. लोक आरोग्यप्रति जागरूक झाल्याने पुढे ऑक्सिजन कॅनची मागणी वाढणार आहे.
घरगुती स्तरावर पोर्टेबल ऑक्सिजन कॅनचा उपयोग करणे सोपे आहे. याद्वारे फुफ्फुस आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ज्यांना थकवा येतो, त्यांच्यासाठीही कॅन उपयोगी आहे. आकस्मिक प्रसंगी कॅनचा उपयोग करता येतो. कॅनमध्ये ९९.९ टक्के शुद्ध ऑक्सिजन असतो. आता हे कॅन मेडिकल किटमध्ये ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. हे कॅन दोन वर्षांपर्यंत उपयोगात येते. ते रिफिल करता येते. १२ लिटरची किंमत ६५० रुपये आहे.
प्रांजल तिडके, एम.फार्म.