स्वाधार योजनेसाठी पोर्टल सुरू, ऑनलाईन अर्ज करता येणार
By आनंद डेकाटे | Published: August 2, 2024 02:43 PM2024-08-02T14:43:14+5:302024-08-02T14:44:31+5:30
Nagpur : भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधेसाठी अर्ज करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२४-२५ मध्ये स्वाधार योजनेचा https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन सदर अर्जाची प्रत सहाय्यक आयुक्त. समाज कल्याण, नागपूर येथे सादर करण्यात यावे, असे जाहिर आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर हे करीत आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावन शासकीय आय. टी. आय समोर, श्रध्दानंद पेठ, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथे संपर्क साधावा.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष
- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा.
- विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न ६ मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल.
- विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
- महानगरपालिकेच्या हद्दीपासून ०५. किमी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात, शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
- विद्यार्थी इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
- इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.