पॉस मशीनमध्ये दुकानदारांची नॉमिनी असावी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:04+5:302021-04-25T04:07:04+5:30
नागपूर : राज्य शासनाची सेवा करीत असताना जीव गमावणाऱ्या रेशन दुकानदाराला शासन जर काहीच देत नसेल तर जीव धोक्यात ...
नागपूर : राज्य शासनाची सेवा करीत असताना जीव गमावणाऱ्या रेशन दुकानदाराला शासन जर काहीच देत नसेल तर जीव धोक्यात घालून शासनाची कामे का करावी, असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांचा आहे. पॉस मशीनमुळे संक्रमण वाढत असल्याने पॉस मशीनची नॉमिनी दुकानदारांना द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांची आहे, अन्यथा वितरण बंद करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे कोणीही व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये म्हणून शासनाच्या नियमांचे पालन करून धान्याचे वितरण सुरू आहे. कोरोना काळात रेशन दुकानदारांमुळे अनेक कुटुंबाची उपासमारी टळली. ही सेवा देत असताना २०२० पर्यंत राज्यात शेकडो रेशन दुकानदारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या वर्षातही मोठ्या प्रमाणात दुकानदार संक्रमित झाले आहेत. जिल्ह्यातही गेल्या चार महिन्यांत ८ ते १० रेशन दुकानदार दगावले आहेत; पण शासनाकडून सुरक्षेच्या रूपात मदत मिळाली नाही.
रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या मागे ई-पॉस मशीनसुद्धा एक कारण आहे. प्रत्येक कार्डधारक ई-पॉस मशीनवर थम्ब लावून धान्य घेत आहे. त्यामुळे संसर्गाचा प्रसार होत आहे. कार्डधारकांचे थम्ब न घेता दुकानदाराला नॉमिनी दिल्यास संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते.
- राशन दुकानदारांना निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप बंद करावे, रेशन दुकानदारांना सुरक्षा विमा प्रदान करावा, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत; पण शासन आमच्या व्यथा गांभीर्याने घेतच नाही. त्यामुळेच १ मेपासून धान्य वितरण बंद करण्याचा आम्ही इशारा दिला आहे.
संजय पाटील, अध्यक्ष, विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटना