नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरील स्थिती : २५ हजार प्रवाशांची वर्दळ, कोरोनाबाबत जनजागृतीही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:10 AM2020-03-13T01:10:32+5:302020-03-13T01:11:58+5:30
गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
एसटी महामंडळाच्या गणेशपेठ बसस्थानकावर दररोज २२०० बसेस ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्या २५ हजाराच्या जवळपास राहते. कोरोनामुळे नागपुरात खळबळ उडालेली असताना ‘लोकमत’ने गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या, याचा आढावा घेतला. परंतु कोरोनाबाबत बसस्थानकावर प्रवाशांमध्ये जागृतीही करण्यात येत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करीत असताना बसस्थानकावर काहीच उपाययोजना न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे, प्रवाशांनी काय काळजी घ्यावी, याबाबत प्रवाशांना सूचना देणे गरजेचे आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या प्रशासनाने याबाबत काहीच उपाययोजना केली नसल्याचे दिसले. एसटी प्रशासनाने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रवाशांना योग्य त्या सूचना देण्याची आणि बसस्थानकावर संशयित प्रवाशांच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
खबरदारी घेण्याच्या मुख्यालयाच्या सूचना
‘प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या एसटीच्या चालक-वाहकांना खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई मुख्यालयाने केल्या आहेत. याशिवाय प्रवाशांमध्येही जागृती करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार आहे. बसस्थानकावर कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय १७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे.’
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.