CoronaVirus in Nagpur : नागपुरात डिस्चार्जनंतर पुन्हा पॉझिटिव्ह : ६८ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:30 PM2020-07-20T22:30:54+5:302020-07-20T22:32:49+5:30
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले. यात एक गर्भवती महिला तर एक पोलीस आहे. सोमवारी ६८ नव्या रुग्णांची भर तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३०२७ झाली असून, मृतांची संख्या ६८ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात सलग १४ दिवसांपासून रुग्णांची संख्या ५० वर जात आहे, तर आठ दिवसांपासून मृत्यूचे सत्र सुरू आहे. यातच रुग्णालयातून सुटी होऊन घरी गेलेले दोन रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. चार आठवड्यांपूर्वी मोमीनपुरा येथील २७ वर्षीय गर्भवती महिला कोविड पॉझिटिव्ह आली. मेयोत दाखल करून उपचार करण्यात आले. लक्षणे नसल्याने दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी ही महिला प्रसुतीसाठी मेयोत दाखल झाली असताना व कोविडची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. अशीच घटना आरपीटीएस येथील पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडली. १५ दिवसांपूर्वी त्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने मेयोत भरती करण्यात आले. दहाव्या दिवशी डिस्चार्जही देण्यात आला. सहज म्हणून रविवारी नमुना तपासला असता आज पॉझिटिव्ह आला. दोन्ही रुग्णांना कुठलीच लक्षणे नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
८३ वर रुग्ण आयसीयूमध्ये
मेडिकलमध्ये २३४ रुग्ण भरती असून, ५३ रुग्ण आयसीयूमध्ये भरती आहेत. यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मेयोमध्ये भरती असलेल्या २३१ रुग्णांमधून २० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. वाढत्या रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम व गंभीर लक्षणे असलेले रुग्णही दिसून येत आहेत. आज मेयोमधून ९, मेडिकलमधून १०, एम्समधून २, खासगी लॅबमधून १३, अॅण्टीजन चाचणीतून ३४ असे ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित ५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९३९ झाली आहे.
या वसाहतीत आढळून आले रुग्ण
कमाल टॉकीज चौक परिसर १, साईनगर जयताळा १, एसबीआय कॉलनी आनंदनगर १, अहल्या देवी मंदिर परिसर धंतोली १, डब्ल्यूसीएल कॉलनी सिव्हिल लाईन्स १, माऊंट कॉर्मेल कॉन्व्हेंट अजनी १, हिमांशू प्लाझा कामगारनगर १, सेवासदन गांधीबाग १, टेलिकॉमनगर १, दिघोरी १, सोनेगाव २, शांतिनगर १ व चंद्रनगर १ असे १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मनपाकडे ही नोंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाली आहे.
कामठीत पुन्हा १३ पॉझिटिव्ह
कामठी तालुक्यात पुन्हा १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तालुक्यात बाधितांची संख्या २०४ झाली आहे. बुटीबोरी जुनी वसाहतीमध्ये २४ वर्षांच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. बाधित मुलगा सुमारे ३०० वर लोकांच्या संपर्कात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कन्हानमध्ये पाच रुग्णांची भर पडली, बाधितांची संख्या २७ झाली आहे. कुही तालुक्यातील देवळी (कला) येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. कोंढाळी येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. ग्रामीणमध्ये आज २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
संशयित : २९८९
बाधित रुग्ण : ३०२७
घरी सोडलेले : १९३९
उपचार घेत असलेले रुग्ण : १०३३
मृत्यू : ५४