याेगसाधनेने संचारली सकारात्मक ऊर्जा; कस्तुरचंद पार्कवर हजाराेंनी केली सामूहिक याेगसाधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 08:49 PM2022-06-21T20:49:02+5:302022-06-21T20:49:44+5:30
Nagpur News नागपुरात जागतिक याेग दिनाचा उत्सव साजरा झाला. याेग सुदृढ आराेग्याचा पर्याय ठरला आहे. कस्तुरचंद पार्कवर झालेल्या सामूहिक याेगसाधनेने उपस्थितांच्या तनामनात सकारात्मक ऊर्जा संचारली हाेती.
नागपूर : ताडासन, कटिचक्रासन, विवेकासन, मत्सासन, गाेमुखासन, सूर्यनमस्कारासह वेगवेगळ्या प्रकारची लयबद्ध याेगासने. रबरासारखी शरीराची लवचिकता दर्शवित वेगवेगळ्या भावमुद्रेत नियमित याेगाभ्यासी विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिके आणि हजाराे नागरिकांना एकत्र करणारा सांघिक याेग, अशा भारावलेल्या वातावरणात नागपुरात जागतिक याेग दिनाचा उत्सव साजरा झाला. याेग सुदृढ आराेग्याचा पर्याय ठरला आहे. कस्तुरचंद पार्कवर झालेल्या सामूहिक याेगसाधनेने उपस्थितांच्या तनामनात सकारात्मक ऊर्जा संचारली हाेती.
नागपूरचे झिराे माॅईल हे देशातील महत्त्वाचे स्थळ आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त देशातील ७५ महत्त्वाच्या ठिकाणी याेगदिन साजरा करण्यात आला व त्यामध्ये झिराे माॅईलजवळ कस्तुरचंद पार्कवर झालेल्या सामूहिक याेगसाधनेचाही समावेश हाेता. हजाराे स्त्री, पुरुष, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही एकत्र येऊन केलेल्या याेगाने येथील वातावरणात उत्साह संचारला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री गडकरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य आलोक, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मैसूर येथून केलेल्या संबोधनाचेही थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले.
जनार्दन योगाभ्यासी मंडळातर्फे प्रशिक्षकांनी सांगितलेली नितीन गडकरी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित हजारो नागरिकांनी केली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी याेगासनाची चित्तवेधक प्रात्याक्षिके सादर केली. सकाळी ५ वाजतापासून माेठ्या संख्येने लाेक यामध्ये सहभागी झाले हाेते. शहरातील विविध सामाजिक संस्था, योगा मंडळे आणि विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती. अबाल-वृद्धांनी उत्साहाने सहभाग नोंदविल्याने वातावरणात उर्जा संचारली होती. हजारो योग साधक एकत्र येत असल्याने एक वेगळेच सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना सहभागींनी बोलून दाखविली. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी मेट्रोतर्फे निःशुल्क सेवा देण्यात आली असल्याने शेकडो नागरिकांनी या मेट्रोसेवेचाही लाभ घेतला.
याेग प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग बनावा : गडकरी
नागपूर : काेणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी पैसा खर्च करावा लागताे. याेगाभ्यास मात्र विनामूल्य आहे. विदेशात योग प्रशिक्षकांना भरमसाठ शुल्क द्यावे लागते तर भारतात अनेक योगाभ्यासी मंडळ योगसेवा निस्पृःह वृत्तीने करत आहेत. सर्व नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर नियमित रित्या योगाभ्यासाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले