इंग्लंडहून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण दोन दिवस घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:43+5:302021-01-03T04:09:43+5:30
नागपूर : अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारातील संशयित रुग्णांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे आली आहेत. परंतु मनपा प्रशासन ...
नागपूर : अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारातील संशयित रुग्णांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे आली आहेत. परंतु मनपा प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याचे नुकत्याच एका प्रकरणातून पुढे आले. इंग्लंडहून नागपुरात परतलेला एक व्यक्ती २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत घरीच होता. लक्षणे दिसल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली. यात तो पॉझिटिव्ह आला. दोन दिवसानंतर ही माहिती उघड झाल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी रात्री १० वाजता मेडिकलमध्ये दाखल केले.
कोरोना विषाणूचे नवे रूप जास्त धोकादायक आणि संक्रामक आहे. यामुळे कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार इंग्लंड, युरोपियन युनियन, मिडल ईस्ट व साऊथ आफ्रिका येथून २५ नोव्हेंबरपासून ते २३ डिसेंबर दरम्यान नागपुरात परतलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे व अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तातडीने मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्याच्या सूचना आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, २३ डिसेंबरनंतर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याचा नियम आहे. परंतु प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. विठ्ठलवाडी हुडकेश्वर रोड येथील रहिवासी ३८ वर्षीय पुरुष इंग्लंडहून मुंबई येथे १९ डिसेंबर रोजी परतला. मुंबईहून ती व्यक्ती मध्यप्रदेश येथील पचमढी येथे गेली. पाच दिवसानंतर २५ डिसेंबर रोजी नागपुरात परतली. नियमानुसार या व्यक्तीला त्याच दिवशी संस्थात्मक अलगीकरणात पाठविणे आवश्यक होते. परंतु याची गरज कुणालाच वाटली नाही. २९ तारखेला या व्यक्तीने लॉ कॉलेज चौकातील केंद्रात जाऊन आरटीपीसीआर चाचणी केली. परंतु याचा अहवाल तब्बल दोन दिवसानंतर, ३१ डिसेंबर रोजी आल्याने त्याच दिवशी रात्री मेडिकलमध्ये दाखल केल्याचे मनपाचे डॉ. बकुल पांडे यांनी सांगितले. तर ‘लोकमत’ने संबंधित केंद्रात या विषयी चौकशी केल्यावर ३० डिसेंबर रोजीच अहवाल आल्याचे तेथील जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे हे प्रकरण लपविल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
-पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच उपचार
सूत्रानुसार, बुधवार ३० डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर या रुग्णावर घरीच उपचार झाले. ‘फॅविपीरॅवीर’ ही औषधीही देण्यात आली. औषधोपचार करणारे मनपाचे डॉक्टर असल्याचे बोलले जात आहे
-माहिती मिळताच मेडिकलमध्ये दाखल
या प्रकरणाविषयी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना विचारले असता, ते म्हणाले, रुग्णाची माहिती मिळताच मेडिकलमध्ये दाखल केले. रुग्णाने विदेश प्रवासाची माहिती लपवून ठेवली असावी, म्हणून भरती करण्यास उशीर झाला असावा.