नागपुरातील पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधून पळाला पॉझिटिव्ह रुग्ण; ‘इथे’ लपून बसला होता..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 09:42 AM2020-07-13T09:42:53+5:302020-07-13T09:43:15+5:30
पाचपावली क्वॉर्टर येथील अलगीकरण कक्षात (क्वारंटाईन सेंटर) सध्या ५५० संशयित रुग्ण दाखल आहेत. यात गुलशननगर येथील ३० वर्षीय हा युवकही होता. रात्री ७ वाजताच्या सुमारास सेंटरमध्ये जेव्हा जेवण आले तेव्हा त्याने याचा फायदा घेत पळून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या युवकाच्या नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर तो तेथील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. रात्री जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात ही बाब येताच खळबळ उडाली. पोलिसांच्या शोधाशोधनंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास तो त्याच्या घरी सापडला. या घटनेवरून क्वारंटाईन सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाचपावली क्वॉर्टर येथील अलगीकरण कक्षात (क्वारंटाईन सेंटर) सध्या ५५० संशयित रुग्ण दाखल आहेत. यातील ११ संशयितांचे नमुने शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले. रविवारी या सर्वांना मेयो व मेडिकलध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार होते. याची माहिती संबंधित रुग्णांना देण्यात आली. यात गुलशननगर येथील ३० वर्षीय हा युवकही होता. प्राप्त माहितीनुसार, रात्री ७ वाजताच्या सुमारास सेंटरमध्ये जेव्हा जेवण आले तेव्हा त्याने याचा फायदा घेत पळून गेला. रात्री डॉक्टरांनी राऊंड घेतला तेव्हा एक रुग्ण कमी असल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने याची माहिती सेंटरच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना दिली. त्यांनी सुरुवातीला सर्व सेंटर हुडकून काढले नंतर आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरू केली. अखेर पोलीस गुलशननगर येथील त्याच्या घरी पोहचले. पोलिसांनी घराची पाहणी केली असता रुग्ण गच्चीवर लपून बसला होता. घरी आई-वडील होते. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याला पुन्हा पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये आणले. संबंधित रुग्ण हा पॉझिटिव्ह असल्याने यादरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे.
पोलिसांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष
पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये मोठ्या संख्येत संशयित रुग्ण दाखल असताना, तेथील रुग्ण व डॉक्टरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. त्याच्यानुसार पोलीस सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. बहुसंख्य पोलीस ड्युटीच्या वेळेत मोबाईल पाहत असतात. काही तर चार-पाच पोलीस मिळून मोबाईलवर खेळत असतात.