CoronaVirus in Nagpur : मुंबईहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ३७४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:50 PM2020-05-19T23:50:39+5:302020-05-19T23:55:31+5:30
मुंबई येथून नागपुरात आलेला रुग्णाचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्याने रुग्ण वाढणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई येथून नागपुरात आलेला रुग्णाचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्याने रुग्ण वाढणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे. हा रुग्ण नारा संतोषीनगर वसाहतीतील आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर आणखी एका नव्या वसाहतीचा भार वाढला आहे. मेडिकलमधून आज पुन्हा १७ तर मेयोतून एका रुग्णाला सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २९० झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. हे पाचही रुग्ण मुंबई येथून आले होेते. एवढेच नव्हे तर ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू असलेल्या बुलडाण्यातही दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून आलेली महिला पॉझिटिव्ह आली. भंडारा व यवतमाळमध्येही असेच प्रकरण समोर आले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. आज पॉझिटिव्ह आलेली ४५ वर्षीय व्यक्ती सोमवारी मुंबईवरून नागपुरात आली. ती नारा येथील संतोषीनगर येथील रहिवासी आहे. याची माहिती लोकांना झाल्यानंतर त्यांनी या व्यक्तीला मेयोमध्ये जाऊन तपासणी करून घेण्यास सांगितले. मेयोच्या कोविड ओपीडीमध्ये त्याची तपासणी केल्यावर त्याला ताप असल्याचे निदान झाले. शिवाय त्याची मुंबई प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने भरती करून घेण्यात आले. आज त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. या प्रकरणावरून प्रवासावरून आलेल्या प्रत्येकाने तपसणी करून घेणे गरजेचे असल्याचे मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांचे म्हणणे आहे.
कोरोनामुक्त झालेल्या महिलेची प्रसूती
मेयोमध्ये गेल्या १६ दिवसांपासून भरती असलेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे आज दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. रुग्णालयातून सुटीची प्रक्रिया सुरू असताना अचानक महिलेच्या पोटात दुखणे सुरू झाले. डॉक्टरांनी तिला तातडीने लेबर रूममध्ये नेले. तिने एका गोंडस बालकाला जन्म दिला. ही महिला मोमिनपुरा येथील राहणारी आहे.
सहा वर्षांच्या मुलासह १८ रुग्णांनी केली कोरोनावर मात
मेयोमधून एक तर मेडिकलमधून आज १७ असे एकूण १८ रुग्णांना नवीन डिस्चार्ज धोरणानुसार सुटी देण्यात आली. यात मोमिनपुरा येथील ६ वर्षाच्या मुलासह १३ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य रुग्ण मोमिनपुरा व सतरंजीपुरा येथील आहेत. या रुग्णांनी पुढील सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे.
पोलिसांच्या संपर्कातील ३५ नमुने निगेटिव्ह
कंटेन्मेंट झोन असलेल्या मोमिनपुरा येथे ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिसांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांसह काही पोलिसांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ३५ वर नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत ७,८७४ नमुने निगेटिव्ह
नागपुरात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण दिसून येऊ लागले तेव्हापासून ते आतापर्यंत ८,२४८ नमुने तपासण्यात आले. यातील ३७४ नमुने पॉझिटिव्ह आले असून ७,८७४ नमुने निगेटिव्ह आले. मंगळवारी तपासण्यात आलेल्या ४७५ नमुन्यांमध्ये केवळ एक नमुना पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ५९६
दैनिक तपासणी नमुने ४७५
दैनिक निगेटिव्ह नमुने ४७४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३७४
नागपुरातील मृत्यू ७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २९०
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,१४०
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,१३१
पीडित-३७४-दुरुस्त-२९०-मृत्यू-७