पॉझिटिव्ह स्टोरी; दहा वर्षापासून आजारी व्यक्तीसह कुटुंबीयांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:52 PM2021-05-03T13:52:35+5:302021-05-03T13:53:46+5:30
Coronavirus in Nagpur संयम, सकारात्मक विचार आणि यथायोग्य मार्गदर्शनाने आरोग्याच्या अतिशय बिकट स्थितीतही अनेक जण या महाभयंकर संक्रमणाला मात देत आहेत. म्हाळगीनगरातील असेच एक कुटुंब आहे, ज्यांनी गेल्या दहा वर्षापासून अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीसह संक्रमणाचा यशस्वीरीत्या सामना केला आणि कोरोनामुक्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संकट येऊच नये, असे प्रत्येकाला वाटते. ते स्वाभाविकही आहे. मात्र, संकटे प्रत्येक व्यक्तीला शिकवून जातात, धडा देऊन जातात आणि भविष्यवेधी योजनांचे संकेत देऊन जातात. पहिल्या लाटेपेक्षा कोरोना संक्रमणाची दुसरी लाट महाभयंकर आहे. रुग्णांची स्थिती, वैद्यकीय सेवेचे निघालेले धिंडवडे, औषधांचा तुटवडा आदी सर्व नकारात्मक दुनियेत आशेचे किरण देणाऱ्या काही गोष्टीही घडत आहेत. संयम, सकारात्मक विचार आणि यथायोग्य मार्गदर्शनाने आरोग्याच्या अतिशय बिकट स्थितीतही अनेक जण या महाभयंकर संक्रमणाला मात देत आहेत. म्हाळगीनगरातील असेच एक कुटुंब आहे, ज्यांनी गेल्या दहा वर्षापासून अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीसह संक्रमणाचा यशस्वीरीत्या सामना केला आणि कोरोनामुक्त झाले.
म्हाळगीनगर येथे राहणारे प्रकाश चिकारे यांचा वर्धा येथे फोटो स्टुडिओ होता. २०१० मध्ये नागपुरात तुकडोजी चौकात काही टवाळखोर तरुणांनी भरधाव वेगाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्यांचा डावा भाग पूर्णत: लुळा पडला. वेगवेगळ्या शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी त्यांना वर्धा येथील सगळी संपत्ती विकावी लागली. तरीदेखील यश आलेले नाही. तेव्हापासून ते अंथरुलाच खिळले आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी नीता, मोठी मुलगी पल्लवी व लहान मुलगा सुमित आहेत. अशात त्यांना व कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाने विळखा दिला. डॉक्टरांनी एकूणच स्थिती बघता चिकारे कुटुंबीयांना गृहविलगीकरणातच उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र, काही दिवसानंतर प्रकाश चिकारे यांची प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यास सांगितले. मात्र, खासगी हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नव्हता आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेता येणे शक्य नव्हते. अशा स्थितीत मौठ्या धैर्याने कुटुंबीयांनी त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजन, औषधे आदींची व्यवस्था घरीच करण्यात आली आणि तीन आठवड्यात प्रकाश चिकारे यांच्यासह घरचे सगळे सदस्य कोरोनामुक्त झाले. वर्तमानात हॉस्पिटल आणि बेड्ससाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा एक मोठ्ठा धडाच चिकारे कुटुंबीयांनी दिला आहे.
हा एक चमत्कारच होता
बाबांना अनेक प्रकारचे संसर्ग याआधी झाले होते. त्यात कोरोना संसर्ग म्हणजे वेगळ्याने सांगायला नको. शिवाय, वृत्तपत्रे, न्यूज चॅनल्स, लोकांच्या चर्चांतून कोरोना महामारीची भयावहता अनुभवत होतोच. अशात घरातच आणि विशेष म्हणजे बाबांना झालेला संसर्ग सगळ्यांना गर्तेत टाकणारा ठरला. ते तीन आठवडे अतिशय तणावाचे होते. काय होणार, कसे होणार, हा एकच प्रश्न होता. बाबांना प्रारंभी संसर्गाबद्दल सांगितले नव्हते. मात्र, त्यांना जाणीव झाली होती. अशा स्थितीत त्यांनी कोरोनाला हरवले आणि आम्हीही कोरोनामुक्त झालो, ही सकारात्मक बाब आहे. डॉक्टरांनी तर हा एक चमत्कारच असल्याची भावना व्यक्त केली.
- पल्लवी चिकारे, म्हाळगीनगर
............