पॉझिटिव्हिटीचा दर २२ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:35+5:302021-05-07T04:08:35+5:30
नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येने मागील महिन्यात एकाच दिवशी ७,९९९ रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ३१ टक्क्यांवर पोहचला ...
नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येने मागील महिन्यात एकाच दिवशी ७,९९९ रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ३१ टक्क्यांवर पोहचला होता. मात्र, गुरुवारी हाच दर २२ टक्क्यांवर आला. आज ४,९०० नवे रुग्ण व ८१ मृत्यू नोंदविण्यात आले. रुग्णांची एकूण संख्या ४,३७,८३८ तर मृतांची संख्या ७,९०९ झाली. विशेष म्हणजे, दैनंदिन बाधितांच्या तुलनेत अधिक म्हणजे ६,३३८ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचाही दर वाढून ८३ टक्क्यांवर गेला आहे.
कोरोनाचा वेग मंदावत असल्याने नागपूर जिल्ह्यात काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. १ मे रोजी ६,५७६ रुग्ण आढळून आले असताना त्यानंतर सलग पाच दिवस दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजाराखाली होती. गुरुवारी १८,००३ आरटीपीसीआर तर ३,८७५ रॅपिड अँटिजेन असे एकूण २१,८७८ चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरमधून ३,९८८ तर अँटिजेनमधून ९१२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत असली तरी मेयो, मेडिकल व एम्ससह काही खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळविणे अद्यापही कठीण आहे. सध्या मेडिकलमध्ये ८००, मेयोमध्ये ६०० तर एम्समध्ये २३६ रुग्ण उपचार घेत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटर मिळून १३,०२८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ५१,५६९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-शहरात २,७२० तर ग्रामीणमध्ये २,१६७ रुग्ण
गुरुवारी शहरात २,७२० रुग्ण व ४७ मृत्यूची नोंद झाली, तर ग्रामीणमध्ये २,१६७ रुग्ण व २१ रुग्णांचे बळी गेले. जिल्हाबाहेरील नागपुरात उपचार घेत असलेले १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले व तेवढ्याच रुग्णांचे मृत्यूही झाले. शहरात आतापर्यंत ३,१२,०२४ रुग्ण व ४,७८० मृत्यूची नोंद झाली तर, ग्रामीणमध्ये १,२४,५०४ रुग्ण आढळून आले व २,००१ रुग्णांचे बळी गेले.
-सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट
२९ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ७७,६२७ होती. मात्र, त्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने या संख्येतही घट दिसून येत आहे. गुरुवारी ६४,५९७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते.
::कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या: २१,८७८
ए.बाधित रुग्ण :४,३७,८३८
सक्रिय रुग्ण : ६४,५९७
बरे झालेले रुग्ण :३,६५,३३२
ए.मृत्यू : ७,९०९