येवल्यातील तडीपार गुन्हेगार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:05 AM2019-07-27T01:05:15+5:302019-07-27T01:05:30+5:30
: येवला तालुक्यातील सराईत गुन्हेगार अजय ऊर्फ छोट्या प्रभाकर वाघ यास नाशिक व नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करूनही तो येवला शहरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नाशिक : येवला तालुक्यातील सराईत गुन्हेगार अजय ऊर्फ छोट्या प्रभाकर वाघ यास नाशिक व नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करूनही तो येवला शहरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीनंतर तडीपारीच्या काळात जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील सराईत गुन्हेगार अजय उर्फ छोट्या प्रभाकर वाघ याच्यासह त्याच्या टोळीतील पाच जण तीन वर्षांपासून गुन्हेगारी कारवायात सक्रीय झाले होते. त्यामुळे वाघ याच्यासह पाच जणांवर दोन वर्षाकरीता तडीपारीची कारवाई करण्यात आलेली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अजय वाघ हा येवला शहरात विनापरवानगी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार येवला शहर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, वाघ याने त्याच्या साथीदारासह जून महिन्यात पिंपळगाव जलाल शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ एका मोटारसायकल स्वारात अडवून चाकूचा धाक दाखवत लूटमार केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हल्लेखोर ताब्यात
चांदवड तालुक्यातील वडबारे शिवारात दि. २४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दोन महिलांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात सुशिलाबाई माळी व लंकाबाई माळी या जखमी झाल्या होत्या. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी संशयित रोहिदास भिका पवार (३५) रा. वडबारे यास ताब्यात घेतले असता त्याने हल्ल्याची कबुली दिली आहे.