झोपडपट्टीवासीयांना सहा महिन्याच्या आत पट्टेवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:20 AM2019-04-01T10:20:35+5:302019-04-01T10:21:14+5:30
पुढील सहा महिन्याच्या आत झोपडपट्टीवासीयांना पट्टे मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपडपट्टीवासीयांना पट्टे देण्याची अनेक काळापासूनची मागणी होती. आम्ही आश्वासन दिले होते. त्यानुसार शहरातील झोपडपट्टीवासीयांना पट्टेवाटप केले व त्यांना घरमालक केले. उर्वरित लोकांना पुढील सहा महिन्याच्या आत पट्टे मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले.
उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील कळमना येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उत्तर नागपुरात गडकरी यांच्या तीन सभा झाल्या. या सर्वच सभांना चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी मंचावर खासदार डॉ विकास महात्मे, आ. डॉ मिलिंद माने, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विकी कुकरेजा, बरिएमंच्या नेत्या अॅड.सुलेखा कुंभारे, रमेश फुले, प्रभाकर येवले, बंडू तळवेकर, परिणीती शेख, मनिषाताई पाटील, सुनिताताई नेवारे, शेषराव गोतमारे, भोजराज डूंबे, राजू बहादुरे, वैभव गुप्ता, श्रीपाद रिसालदार, राजेश बागडी, नवनीतसिंग तुली प्रामुख्याने उपस्थित होते. शहरात ‘मेट्रो’चे काम वेगात सुरू असून कामठी, कन्हान नदीपर्यंत ‘मेट्रो’चा विस्तार होणार आहे. उत्तर नागपुरमधील कळमना स्थानक हे सुंदर व भव्य राहणार आहे. त्यादृष्टीनेच या स्थानकाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१७०० कोटींच्या रिंगरोडचे काम सुरू आहे. कामठी-कळमना मार्गामुळे उत्तर नागपूरचा विकास होणार आहे. मी ज्यावेळी रस्ता बांधला तेव्हा जमिनी विकू नका, असे सांगितले होते. आज जमिनीचे दर वाढले आहे. पुढे हा रस्ता चार पदरी होणार असून त्यामुळे या भागाचे महत्त्व आणखी वाढेल. उत्तर नागपुरात कळमना, शांतिनगर, विनोबा भावे नगर भागात चौफेर विकास व्हावा व गरीब मुलांच्या हाताला काम देणे हेच माझे ध्येय आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात १३० ‘ग्रीन जिम’ सुरू करणार आहोत. या माध्यमातून शहराला सुंदर बनवायचे आहे. क्रीडा, शिक्षण, दळणवळण, पायाभूत सुविधा, रस्ते, सांस्कृतिक क्षेत्र सर्वच बाबींचा विकास झाला आहे. नागपूर जगातील सर्वात चांगले शहर झाले पाहिजे, असा मानस आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.
विविध संघटनांचे गडकरींना समर्थन
नितीन गडकरी यांना विविध संस्था व संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे. अखिल भारतीय विश्वकर्मामय विकास मंडलचे अध्यक्ष विष्णुपंत मोरेकर,सचिव रमाकांत वरुडकर,कोषाध्यक्ष विजय खिरपुरकर,उपाध्यक्ष अशोक पातुरकर,उपाध्यक्ष सुरेंद्र निलटकर यांनी गडकरी यांच्या समर्थनार्थ पत्र लिहीले आहे. राजपूत समाज मंचचे अध्यक्ष डॉ कैलाशसिंह चौहान, सचिव रमेशसिंह ठाकूर,कोषाध्यक्ष शैलेषसिंह मौर्य यांनीदेखील गडकरी यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. सोबतच राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था(नाफ) ने देखील गडकरी यांना समर्थन दिले आहे. अध्यक्ष सी.वी.क्लोटी, कार्याध्यक्ष आर.वी.पोकाले,महासचिव दिलीप ढोले,उपाध्यक्ष वी.एन.श्रीवास्तव,एस.डी.ढोले यांनी गडकरी यांच्या समर्थनार्थ पत्र जारी केले आहे.