नागपूर जिल्ह्यात ७ पंचायत समित्या महिलांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 08:40 PM2020-01-13T20:40:41+5:302020-01-13T20:41:59+5:30
जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितींच्या सभापतींचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. यात जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांमध्ये महिलांना सभापती म्हणून संधी मिळणार आहे. १७ जानेवारीला सभापतींची निवड होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितींच्या सभापतींचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. यात जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांमध्ये महिलांना सभापती म्हणून संधी मिळणार आहे. १७ जानेवारीला सभापतींची निवड होणार आहे.
८ जानेवारीला निवडणुका पार पडल्यानंतर विजयी उमेदवार सभापतीच्या आरक्षणाच्या प्रतिक्षेत होते. जिल्हा निवडणुक कार्यालयाने सोमवारी तेराही पंचायत समितीचे आरक्षण काढले. नरखेड, सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौदा, नागपूर ग्रामीण, कुही या पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून महिलेची निवड होणार आहे. तर काटोल, कळमेश्वर, कामठी, हिंगणा, उमरेड व भिवापूर या पंचायत समितीचे आरक्षण संबंधित प्रवर्गासाठी निघाले असले तरी, पुरुषांसोबत महिला सुद्धा यावर दावा करू शकतात. यंदा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला राज राहणार हे स्पष्ट झाले आहे.
पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण जाहीर
नरखेड : सर्वसाधारण महिला
काटोल : अनुसूचित जाती
कळमेश्वर : सर्वसाधारण
सावनेर : सर्वसाधारण महिला
पारशिवनी : अनुसूचित जाती महिला
रामटेक : नामाप्र महिला
मौदा : नामाप्र महिला
कामठी : सर्वसाधारण
नागपूर ग्रामीण : अनुसूचित जमाती महिला
हिंगणा : नामाप्र
उमरेड : अनुसूचित जाती
कुही : सर्वसाधारण महिला
भिवापूर : नामाप्र
यांना लागणार सभापतीसाठी लॉटरी
काटोल : धम्मपाल खोब्रागडे (राष्ट्रवादी)
पारशिवनी : करुणा भोवते (काँग्रेस)
उमरेड : रमेश किलनाके (काँग्रेस)
भिवापूर : नंदा नारनवरे (अपक्ष)
नागपूर ग्रामीण : रेखा वरठी (काँग्रेस )
सर्वाधिक संभाव्य उमेदवार नरखेडमध्ये
नरखेड पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाले आहे. ही पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पण येथे रश्मी आरघोडे, निलीमा रेवतकर, माया मुढोरीया, अरुणा मोवाडे हे चार उमेदवार उमेदवार आहे. कळमेश्वर पंचायत समितीवर काँग्रेसच्या ताब्यात असून, येथे धापेवाडा गणातील जयश्री वाळके व उबाळी गणातील वंदना बोधाने या संभाव्य उमेदवार आहे. सावनेर पंचायत समिती ही काँग्रेसच्या ताब्यात असून, येथे पुष्पा करडमारे व अरुणा शिंदे हे संभाव्य उमेदवार आहे. १० सदस्यांच्या रामटेक पंचायत समितीवर ५ सदस्य काँग्रेसचे निवडून आले असून, येथे काँग्रेसच्या भूमेश्वरी कुंभलकर व कला ठाकरे या संभाव्य उमेदवार आहे.
येथे होणार चुरशीची लढत
१४ सदस्याच्या हिंगणा पंचायत समितीमध्ये ७ राष्ट्रवादी व ७ भाजपाचे उमेदवार निवडून आले आहे. येथे पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण हे नागरीकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित आहे. येथे भाजपाकडून बबिता आंबेडकर व सुरेश काळबांडे तर राष्ट्रवादीकडून बबनराव आव्हाले व अंकिता ठाकरे हे संभाव्य उमेदवार आहे. तर ८ सदस्यांच्या मौदा पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ५, भाजप ३ व सेनेचे २ उमेदवार निवडून आले आहे. येथे आरक्षणानुसार सेनेच्या रक्षा थोटे व काँग्रेसच्या दुर्गा ठवकर या सभापतीसाठी संभाव्य उमेदवार आहे. त्यामुळे येथे सभापतीच्या निवडीत चुरस निर्माण होणार आहे. ८ सदस्यांच्या कामठी पंचायत समितीत ४ काँग्रेस व ४ भाजप चे सदस्य आहे. आरक्षणानुसार येथे सुमेध रंगारी व दिलीप वंजारी हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहे. तर भाजपाकडून उमेश रडके हे संभाव्य उमेदवार आहे. कुहीमध्ये ५ भाजप व ३ काँग्रेसचे उमेदवार आहे. येथे आरक्षणानुसार अश्विनी शिवणकर या भाजपाच्या तर मंदा डहारे या काँग्रेसच्या उमेदवार आहे.