९, १० मार्चला विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 04:50 PM2022-03-07T16:50:43+5:302022-03-08T15:36:31+5:30
दाेन दिवस ढगांची गर्दी व तुरळक पावसाची हजेरी नागपूरसह काही भागात झाली हाेती. शनिवारपासून पुन्हा आकाश निरभ्र झाले असून तापमानात वाढ झाली आहे.
नागपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हालचालींमुळे येत्या ९ व १० मार्चला विदर्भात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीनुसार पीक काढणीचे नियाेजन करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
बंगालच्या उपसागरात पुढील १२ तासात कमी दाबाचा पट्टा तयार हाेत आहे. हा पट्टा दक्षिण-पश्चिम दिशेने हाेत उत्तर तामिळनाडूकडे सरकत जाईल. याचा परिणाम विदर्भाच्याहवामानावर हाेताना दिसेल. दाेन दिवस ढगांची गर्दी व तुरळक पावसाची हजेरी नागपूरसह काही भागात झाली हाेती.
शनिवारपासून पुन्हा आकाश निरभ्र झाले असून तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील दाेन दिवस वातावरण असेच राहणार आहे. मात्र ९ मार्चला त्यात बदल हाेण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पाऊस व विजांचा कडकडाट हाेण्याचा अंदाज आहे.