महाराष्ट्रात कधीही राजकीय स्फोटाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 08:10 PM2022-04-06T20:10:27+5:302022-04-06T20:10:55+5:30
Nagpur News हे सरकार अनैसर्गिक असून तेथील नेत्यांची नाराजी जाहीरपणे सर्वांसमोर येईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नागपूर : भाजपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भाजपाचे नेते व राज्याचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात कधीही राजकीय स्फोट होऊ शकतो, असा दावा केला आहे. हे सरकार अनैसर्गिक असून तेथील नेत्यांची नाराजी जाहीरपणे सर्वांसमोर येईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. भाजपाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीत सहभागी कुणी नेतेमंडळी नाराज असतील व भाजपाच्या संपर्कात असतील ते आता सार्वजनिक करण्याची आवश्यक नाही. गनिमी कावा जाहीरपणे समोर आणला जात नाही. योग्य वेळ व स्थिती पाहून राजकीय स्फोट केले पाहिजेत. राज्याचे सध्याचे चित्र पाहता नक्कीच लवकरच राजकीय स्फोट होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जातीय दंगली होऊ शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. पाटील यांना दंगलींबाबत माहिती असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. गृहविभागाने नोटीस पाठवून पाटील यांना बोलावून त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतली पाहिजे. पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडे काही माहिती असेल, तर ती दंतकथा निश्चितच नसेल. जर पोलीस चौकशी करणार नसतील तर केंद्रीय पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले.
तुम्हाला नोटीस येते तेव्हा असत्यमेव जयते का?
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना नोटीस दिली जाते त्यावेळी सत्यमेव जयते असे म्हटले जाते. मात्र, संजय राऊत यांना नोटीस येते तेव्हा असत्यमेव जयते असा कांगावा केला जातो. लोकशाहीमध्ये भाषण स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य आहे. मात्र, काही लोकांचा मूळ स्वभाव झाला आहे की, जेव्हा स्वतःची चूक होते तेव्हा स्वतः त्या चुकीच्या समर्थनात न्यायाधीश होतात आणि जेव्हा दुसऱ्याचे चुकते तेव्हा त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होतात. हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
कंगना-राऊतांच्या विचारांत समानता आली
कंगना रनौतच्या कार्यालयावर बुलडोझर चालवायला सत्ताधारी निघाले होते तेव्हा तिने म्हटले होती की, मी या मालमत्तेसाठी कष्ट केले, त्रास सहन केला. छोट्या चुकीसाठी कार्यालय तोडणे योग्य नाही. आज तीच भाषा संजय राऊतांच्या तोंडी आहे. काही महिन्यांनी का होईना; पण दोघांच्याही विचारात समानता आली, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.