नवरात्रोत्सवात सोने उजळण्याची शक्यता; बुधवारी दर स्थिर; चांदीत चढउतार
By मोरेश्वर मानापुरे | Published: October 4, 2023 07:34 PM2023-10-04T19:34:20+5:302023-10-04T19:45:54+5:30
पितृपक्षकाळात ग्राहक सोन्याची खरेदी करीत नसल्याने दरवाढ नसल्याचे चिन्ह आहेत.
नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतात स्थानिक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. बुधवारी सराफा बाजारात सर्वच सत्रात चांदीत चढउतार दिसून आली. मात्र, सोन्याचे दर स्थिर होते. सोने आणि चांदीचे दर उतरल्याने सणांच्या दिवसात ग्राहकांना दोन्ही मौल्यवान धातूंच्या खरेदीची सुवर्ण संधी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
बुधवारी सकाळच्या सत्रात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर २०० रुपयांनी उतरून मंगळवारच्या ५७,२०० रुपयांच्या तुलनेत ५७ हजारांवर स्थिरावले, तर एक किलो चांदीच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण होऊन भावपातळी ६८,१०० रुपयांपर्यंत कमी झाली. सायंकाळच्या सत्रात सोन्याचे दर स्थिरच होते, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ४०० रुपयांची वाढ होऊन भाव ६८,५०० रुपयांवर पोहोचले. पितृपक्षकाळात ग्राहक सोन्याची खरेदी करीत नसल्याने दरवाढ नसल्याचे चिन्ह आहेत. केवळ चांदीच्या दरात चढउतार दिसत आहे. नवरात्रोत्सवात सोने-चांदीचे भाव वाढण्याची शक्यता नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे आणि सचिव राजेश रोकडे यांनी व्यक्त केली.