पूर्व विदर्भात तुरळक पावसाची शक्यता; सूर्याचा ताप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 07:15 AM2022-02-03T07:15:00+5:302022-02-03T07:15:02+5:30
Nagpur News सध्या निर्माण झालेले वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि राजस्थान व आसपासच्या क्षेत्रात तयार झालेल्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे उत्तर भारतात गारांचा आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
नागपूर : सध्या निर्माण झालेले वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि राजस्थान व आसपासच्या क्षेत्रात तयार झालेल्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे उत्तर भारतात गारांचा आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढचे दाेन दिवस बंगालच्या खाडीतून बाष्पीकृत हवेच्या प्रभावामुळे पूर्व भारतात पावसाची वॉर्निंग दिली आहे. या परिस्थितीचा प्रभाव पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात जाणवेल. या भागात काही ठिकाणी हलका पाऊस हाेण्याची शक्यता आहे.
सध्या तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा नाही. पण पुढील काही दिवसात तशी शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पाच दिवस कडाक्याची थंडी साेसल्यानंतर नागपूरकरांना गेल्या दाेन दिवसात काहीसा दिलासा मिळाला आहे. सरासरी तापमान अद्यापही २.८ अंशाने खाली असले तरी, थंडीचा तडाखा कमी झाला आहे. बुधवारी नागपूरचे रात्रीचे किमान तापमान ११.६ अंश नाेंदविण्यात आले. मात्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा १.२ अंशाने वाढले असून ताप जाणवायला लागला आहे. सकाळचे ऊनही कडक वाटत असल्याचा नागपूरकरांचा अनुभव आहे. दिवसा ३१.५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली.
अमरावतीचे किमान तापमान ११ अंश असून ते सरासरीपेक्षा ४.७ अंश खाली असले तरी, २४ तासात त्यात वाढ झाली आहे. यवतमाळातही सरासरी किमान तापमान ४.८ अंशाने खाली आहे. इतर जिल्ह्यातही सरासरी किमान तापमान २ ते २.५ अंशाने खाली असून गारठा कमी झाला आहे.