नागपूर ‘हज हाऊस’मध्ये ‘क्वारंटाईन’ केंद्राची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 09:10 PM2020-04-20T21:10:19+5:302020-04-20T21:11:29+5:30
भालदारपुरास्थित नागपूर हज हाऊस येथे ‘क्वारंटाईन’ केंद्र बनविले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य हज समितीने ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ला नागपूर हज हाऊसच्या सुविधा व व्यवस्थांची माहिती पुरविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भालदारपुरास्थित नागपूर हज हाऊस येथे ‘क्वारंटाईन’ केंद्र बनविले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य हज समितीने ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ला नागपूर हज हाऊसच्या सुविधा व व्यवस्थांची माहिती पुरविली आहे. राज्य हज समितीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ला पत्र लिहून देशातील सर्व ‘हज हाऊस’मध्ये ‘क्वारंटाईन’ केंद्र उपलब्ध करून देण्यासंबंधातील प्रस्तावाचा सल्ला दिला होता. यावरच ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ने महाराष्ट्र राज्य हज समितीला पत्र लिहून ‘नागपूर हज हाऊस’सह राज्यातील सर्व ‘हज हाऊस’ची माहिती मागविली होती.
राज्य हज समितीने संबंधित माहिती दिली आहे. ‘हज हाऊस’च्या नागपुरातील सहा मजली इमारतीमधील अत्याधुनिक सुविधांच्या माहितीचा यात समावेश आहे. नागपूर ‘हज हाऊस’ला ‘क्वारंटाईन’ केंद्र बनविले जाऊ शकते, असे राज्य हज समितीने सांगितले आहे.
४० खोल्यांसह अत्याधुनिक सुविधा
तीन एकर जमिनीवर बनलेल्या ‘हज हाऊस’च्या सहा मजली इमारतीमध्ये एकूण ४० मोठ्या खोल्या आहेत. ‘पार्किंग’चीदेखील सुविधा असून तेथे ‘लिफ्ट’देखील आहे. ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ला ही सर्व माहिती देण्यात आली आहे. जर प्रशासनाने नागपूर ‘हज हाऊस’मध्ये ‘क्वारंटाईन’ केंद्र बनविण्याचे आदेश दिले तर सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती राज्य हज समितीचे ‘सेक्शन ऑफिसर’ गफ्फार पीर साहब मखदूम यांनी दिली.
‘एनआयटी’ने समितीशी केला संपर्क
नागपूर ‘हज हाऊस’ हे ‘सेंट्रल एव्हेन्यू’ला लागून आहे. त्यामुळे प्रशासनाला ‘क्वारंटाईन’ व ‘आयसोलेशन’ केंद्र बनविणे सुविधेचे होईल. यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासनेदेखील संपर्क केला आहे.