१०० युनिटपर्यंत वीज बिल माफ होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:57 AM2020-08-06T10:57:26+5:302020-08-06T10:58:37+5:30
ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने राज्यभरातील नागरिक त्रस्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मागच्या बैठकीत नागरिकांना दिलासा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी यासंदर्भात पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यादरम्यान झालेल्या चर्चेत लॉकडाऊन काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, याबाबत मानस तयार करण्यात आले. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागणीसाठी दबाव निर्माण करतील.
दुसरीकडे महावितरणच्या सूत्रानुसार ऊर्जा विभागाने नियामक आयोगासमोर नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक पर्यायांचा प्रस्ताव पाठविला आहे. यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणे, एकूण बिलावर सूट देणे यासारख्या पर्यायांचा समावेश आहे. महावितरणने स्पष्ट केले की, नागरिकांना दिलासा देण्याबाबत त्यांचा कुठलाही आक्षेप नाही. परंतु वीज बिलात जी काही सूट दिली जाईल, त्याचा भार राज्य सरकारने उचलावा. कंपनीची आर्थिक स्थिती मात्र दिलासा देण्यासारखी नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.