अपघाताचे प्रमाण रोखणे शक्य; 'समृद्धी'वर दर १५० किमीनंतर वाहनाचा वेग २० किमीने कमी करा
By आनंद डेकाटे | Published: July 29, 2023 03:35 PM2023-07-29T15:35:54+5:302023-07-29T15:39:33+5:30
प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांची नाविण्यपूर्ण संकल्पना
नागपूर : राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला समृद्धी महामार्ग सध्या अपघातांमुळेच जास्त चर्चेत आहेत. येथील वाढत्या अपघातांमुळे लोकांमध्येही भिती पसरली आहे. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी शासनही प्रत्नशील असून विविध उपाययोजना करीत आहे. यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधक प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांनी एक नाविण्यपूर्ण संकल्पना मांडली असून यामुळे समृद्धी महामार्गवरील अपघात कमी होण्यास मदत मिळू शकेल.
समृद्धी महामार्गावरी अपघाताचे मुख्यतः दोन कारणे समोर येत आहे. एक तर वाहन चालकाचे संमोहन व दुसरे वाहनाचे टायर फुटणे. नुकत्याच व्हीएनआयटी विद्यार्थ्यांनी संमोहनचे कारण शोधून काढले. समृध्दी महामार्गाचा सरळ मार्ग, सिमेंटच्या रस्त्यावरुन शुभ्र पांढरा मार्ग वाहन चालकाचे मन विचलीत न करता वाहन चालविण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे, वाहन चालक स्वतःचे नियंत्रण विसरुन संमोहित होतो व वाहनावरचा ताबा विचलीत होतो व अपघात होतात.
प्रियल चाैधरी व संजय ढोबळे यांच्या नविन संकल्पनेनुसार वाहन चालकाने आपले वाहन १५० किलोमीटर अंतर चालविल्यानंतर २० किमीने वाहनाची गती कमी करावी. त्यानंतर दर दोन किमीवर २० किमीने वाहनाची गती कमी-कमी करत जावी. याबाबतची माहिती देणारे स्पष्ट व सुंदर फलक रस्त्याच्या बाजुला लावावे. त्यामुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होईल. वाहन चालक संमोहित होणार नाही.
याप्रकारे वाहनाचा वेग ४० किमी पर तास इतका असेल तेव्हा महामार्गावर अर्धा किलोमीटर भागात पाणी साचून ठेवावे. ते वाहन अर्धा किलोमिटर पाण्यातून जाईल व वाहन चालकाला वेगळा अनुभव येईल व तो मुख्यतः संमोहन मुक्त होईल. वाहन चालकाच्या संमोहन मुक्तिसोबत वाहन पाण्यातून गेल्यामुळे वाहनाचे चाके थंडे होतील व चाकातील हवेचा दाब कमी होईल. पुढे १५० किलोमिटर पर्यंत ते टायर फुटण्यापासून वाचेल. यानंतर एका रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाधनगृह, छोटेसे उपहारगृह तयार करावे जेणे करुन वाहन चालकाला तिथे ५-१० मिनिटे थांबवून फ्रेश होता येईल. यानंतर वाहन चालकाने प्रत्येक २ किलोमिटरवर आपल्या वाहनाची गती २० किलोमिटरने वाढवत न्यावी. यामुळे अपघात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.