कोरोनानंतरचे विकार मुलांकरिता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:38+5:302021-02-26T04:10:38+5:30
मेहा शर्मा नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण वाढले आहे. मुलांमधील कोरोनाची तीव्रता कमी ...
मेहा शर्मा
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण वाढले आहे. मुलांमधील कोरोनाची तीव्रता कमी असली तरी, त्यांच्यामधील वाढत्या संक्रमणावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे. कारण, कोरोना बरा झाल्यानंतर निर्माण होणारे विकार मुलांकरिता धोकादायक ठरू शकतात, असे डॉक्टरचे म्हणणे आहे.
यासंदर्भात लोकमतशी बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद भुतडा यांनी सांगितले, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मुलांमधील संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. त्यांना कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून कोरोनाची लागन होत आहे. मुलांमध्ये बरेचदा लक्षणे दिसत नाहीत किंवा हलका ताप, अतिसार, अशक्तपणा इत्यादी लक्षणे जाणवतात. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी, रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यावरून कोरोनाची तीव्रता कमी असल्याचे स्पष्ट होते. परंतु, मुलांमधील कोरोना संक्रमनापेक्षा कोरोना बरा झाल्यानंतर निर्माण होणारा मल्टिसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिन्ड्रोम (एमआयएस-सी) जास्त चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुलांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांनी मुलांमुळे कोरोना झपाट्याने पसरतो अशी माहिती दिली. कोरोना वेगात पसरू नये याकरिता मुलांची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर नागरिकांनी सुरक्षा साधने वापरणे बंद केले. त्यामुळे दुसरी लाट आली. आधी शाळा, पार्क, मैदाने बंद करण्यात आल्यामुळे मुलांचे काेरोनापासून संरक्षण झाले होते. परंतु, आता सर्व उघडण्यात आल्यामुळे आणि पालक बाहेर जायला लागल्याने मुलांमधील कोरोना वाढला आहे. मुलांमधील कोरोना जास्त तीव्र नसला तरी, कोरोना बरा झाल्यानंतर धोकादायक विकार दिसून आले आहेत. कोरोनानंतरच्या एमआयएस-सीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. लवकर निदान झाल्यास पुढील धोका टाळला जाऊ शकतो. ताप, श्वास घेण्यास त्रास, स्ट्रोक या लक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
स्रीरोगतज्ज्ञ डॉ. रूपेश्री भोयर यांनी नवजात बाळांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती दिली. गर्भातील बाळाला कोरोना होण्याचे पुरावे नाहीत. परंतु, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कोरोना रुग्णाकडून कोरोना होऊ शकतो. सुरुवातीला नवजात बाळांना कोरोनाबाधित आईपासून दूर ठेवले जात होते. आता, आवश्यक काळजी घेऊन बाळांना दूध पाजू दिले जाते. नवजात बाळाकरिता आईचे दूध अत्यंत आवश्यक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
-----------------
एमआयएस-सी कसा आहे
१ - मुलांमध्ये दुर्मीळ परिस्थितीत आढळून येतो.
२ - कोरोना बरा झाल्यानंतर २-३ महिन्यांनी दिसतो.
३ - हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस, मेंदू, त्वचा, डोळे इत्यादी अवयवांना हानिकारक.