तालुका पातळीवर स्वीकारावे पोस्टल बॅलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:36 PM2019-04-16T23:36:44+5:302019-04-16T23:38:53+5:30
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘पोस्टल बॅलेट’च्या माध्यमातून मतदान केले आहे. मात्र अनेक कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. सातत्याने तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने मतगणनेपर्यंत ‘पोस्टल बॅलेट’ स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले आहे. मात्र हे जमा कुठे करायचे, याबाबत कर्मचारी व शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. तालुका पातळीवरच ‘बॅलेट’ स्वीकारण्यात यावे, असा सूर उमटू लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘पोस्टल बॅलेट’च्या माध्यमातून मतदान केले आहे. मात्र अनेक कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. सातत्याने तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने मतगणनेपर्यंत ‘पोस्टल बॅलेट’ स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले आहे. मात्र हे जमा कुठे करायचे, याबाबत कर्मचारी व शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. तालुका पातळीवरच ‘बॅलेट’ स्वीकारण्यात यावे, असा सूर उमटू लागला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सरकारी कर्मचारी व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. ‘पोस्टल बॅलेट’साठी त्यांचे अर्जच स्वीकारण्यात येत नसल्याचा या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांनी आरोप केला होता. ‘पोस्टल बॅलेट’ अर्जाच्या संबंधित विधानसभा क्षेत्रातच जमा करावा, असे अधिकारी सांगत आले. यादरम्यान ११ एप्रिल रोजी मतदानदेखील झाले. मात्र ज्यांची निवडणुकीत ‘ड्युटी’ लागली होती ते मताधिकाराबद्दल चिंतित आहेत. निवडणुकीच्या कामावरून परत आल्यानंतर आता ‘पोस्टल बॅलेट’ जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जमा कुठे करायचे, हीच माहिती त्यांच्याकडे नाही.
सुविधा देण्याची मागणी
मतदारांना त्यांच्या घराजवळील बूथवरच मतदानाची संधी मिळावी, असा भारतीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. मतदारांप्रमाणेच ‘पोस्टल बॅलेट’चा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचादेखील विचार झाला पाहिजे. बऱ्याच अंतरावरून आपल्या विधानसभा क्षेत्रात येऊन ‘पोस्टल बॅलेट’ जमा करणे अडचणीचे होते. त्यामुळेच तालुकास्तरावरच ही व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी समोर येत आहे.