पोस्टल दिन सप्ताह विशेष; अद्याप पोस्टमनची सायकल सुटली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:36 AM2018-10-10T11:36:11+5:302018-10-10T11:39:45+5:30

सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे.

Postal Day Week Special; The postman's cycle was not resolved | पोस्टल दिन सप्ताह विशेष; अद्याप पोस्टमनची सायकल सुटली नाही

पोस्टल दिन सप्ताह विशेष; अद्याप पोस्टमनची सायकल सुटली नाही

Next
ठळक मुद्देसुविधा नाही, पेट्रोलचा भत्ताही नाही अल्प मनुष्यबळातच करावे लागते काम

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईल तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडियामुळे पत्राची संकल्पना आता मागे पडली आहे. ख्यालीखुशालीची पत्रे दिसत नसली तरी पोस्टमन मात्र आजही आपल्या सेवेत आहे. काळ बदलला तसे काम बदलले, पण अवस्था मात्र तशीच आहे. सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे.
आधुनिक काळाच्या गरजेनुसार सर्वच क्षेत्रात मोठा बदल घडून येत असताना टपाल विभागातही बदल घडणे साहजिकच होते. दीडशे वर्षे पत्राद्वारे जनतेची सेवा करणाऱ्या या विभागाचाही व्याप आता वाढला आहे. विमा योजना आणि बचत खात्याने सुरू झालेला हा बदल पुढे स्पीड पोस्ट, पोस्ट बँक, आधार केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्राच्या कामांचीही यात भर पडली आहे. नागरिकांची पत्रे पाठविण्याची सवय कमी झाली असली, तरी कॉपोर्रेट व सरकारी कामांसाठी रजिस्टर्ड पत्रे पाठविणे बंधनकारक असल्याने काम वाढले आहे. यासह नवीन सेवांचीही जबाबदारी पोस्टमनला सांभाळावी लागते आहे. हा सगळा व्याप वाढला असताना बदलत्या काळानुसार लागणाऱ्या सुविधा मिळण्याचे भाग्य मात्र पोस्टमनला लाभले नाही, असे दिसते. अनेक पोस्टमननी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्या व्यथा मांडल्या. हा पोस्टमन आजही त्याच्या सायकलने दारोदार फिरतो. विभागातर्फे त्यांना पेट्रोलचा भत्ताही मिळत नसल्याने त्यांना सायकलने फिरण्याशिवाय पर्याय नाही. पोस्टाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातर्फे २०१७ ला पार्सल डिलिव्हरी सेंटर सुरू करण्यात आले व हे पार्सल वितरण करणाºयांना पेट्रोलचा भत्ता मिळतो, मात्र इतर कामांसाठी त्यांना अशी कुठलीही सुविधा मिळत नाही. दुसरीकडे अल्प मनुष्यबळामुळेही कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रव्यवहार कमी झाले असले तरी इतर कामांचा व्याप वाढला आहे. या आवश्यकतेनुसार भरती मात्र होत नाही. एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे ५० जागांची भरती करायला वर्ष-दोन वर्ष लागतात. ही भरती होईपर्यंत नवीन बॅकलॉग तयार होतो. अनेक वर्षांपासून टपाल खात्यात मोठी भरती करण्यात आली नाही. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर पडतो. पोस्टमनबाबतही हीच अवस्था आहे.

२२५ पोस्टमनवर शहराचा भार
केवळ नागपूर शहराचा विचार केल्यास निर्धारीत संख्येनुसार ३३० पोस्टमनची गरज असताना केवळ २०० ते २२५ पोस्टमन कार्यरत आहेत. ही गरजही १० वर्षापूर्वी नोंदविण्यात आली होती. शहराचा प्रचंड वाढलेला व्याप बघता, या कर्मचाऱ्यांना किती अडचणी येत असतील हा विचार केलेलाच बरा. एका पोस्टमनने दिलेल्या माहितीनुसार दररोज पाठीवर २० ते ३० किलोचे वजन घेऊन पत्र, रजिस्टर, लेटरहेड, स्पीड पोस्ट वाटत फिरत असतो. २२ ते २५ इमारतींमध्ये चढ-उतर करावी लागत आहे. या इमारतींना लिफ्टची सुविधा नसल्यास अनेक मजले चढून पत्ता शोधावा लागतो. त्यामुळे तंत्रज्ञानानुसार पोस्टाच्या व्यवहारात बदल करण्यात आले असले तरी मनुष्यबळ आणि सुविधांच्या बाबतीच अजूनही १९ व्या शतकानुसारच काम होते की काय, अशी शंका उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.

Web Title: Postal Day Week Special; The postman's cycle was not resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.