डिजिटल कामात डाक विभाग सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:43+5:302021-08-27T04:11:43+5:30
लाेकमत एक्सक्लुसिव वसीम कुरैशी नागपूर : डाक विभागाने शहरातील ६५ पाेस्ट ऑफिसमध्ये काॅमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू केले आहे. ...
लाेकमत एक्सक्लुसिव
वसीम कुरैशी
नागपूर : डाक विभागाने शहरातील ६५ पाेस्ट ऑफिसमध्ये काॅमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू केले आहे. मात्र, या सेवेला शहरात अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. वर्षानुवर्षे सील-ठप्पे, छाटणी आणि पत्र, लिफाफ्यांचे आदानप्रदान करण्याचे परंपरागत काम करणारे ३० टक्के कर्मचारी डिजिटल काम करताना अडखळत आहेत.
नागपुरात ५ मे २०२० पासून सीएससी सुरू करण्यात आली. यामध्ये माेबाइल, टीव्ही, फास्टॅग रिचार्ज, वीज बिल भरणे, विमा, कर्जाचे हफ्ते भरण्यासह ११६ प्रकारच्या सेवांचा समावेश आहे. यामधील बहुतेक नियमित सेवा असून, सामान्य व्यक्ती स्मार्टफाेनच्या मदतीने त्या पूर्ण करीत असताे. डाक विभागाने या सेवा सुरू तर केल्या; पण ५० पेक्षा अधिक वयाचे बहुतेक कर्मचारी ही काम वेगाने करीत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विभागात ज्या पद्धतीने नवीन कामांचा समावेश करण्यात येत आहे, त्या अनुसार नवीन भरती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जाणकारांच्या मते वयाेवृद्ध कर्मचारी कामामध्ये बदललेल्या या नवीन प्रणालीशी जुळवून घेण्यात असमर्थ ठरत आहेत. काम भरपूर असल्याने कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेबसाइटवरील कामाच्या प्रणालीबाबत प्रशिक्षण देणे विभागासाठीही अशक्य ठरत आहे. सूत्राच्या माहितीनुसार बिल भरण्यासह विविध सेवा देण्यात अतिरिक्त सेवा शुल्क वसूल केले जाते. कासवगतीने काम हाेईल, तर ग्राहकांच्या प्रतिसादावर नक्कीच परिणाम हाेईल. विभागात देण्यात येणाऱ्या सेवेत आयकर रिटर्न भरण्याची सेवासुद्धा आहे. यासाठी पाेस्ट ऑफिसच्या सीएससी सेंटरमध्ये संपर्क केल्यानंतर पुन्हा सीएससी मुख्यालयातूनही ग्राहकांची चाैकशी केली जाते व यामुळे दाेन ठिकाणी माहिती देण्यास ग्राहकांना त्रासदायक वाटते.
शहरात आहेत अनेक पर्याय
सीएससीअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांसाठी शहरात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अगदी कमी वयाची मुलेही माेबाइलचा वापर करून माेबाइल, टीव्ही, फास्टॅग रिचार्ज, पाण्याचे बिल, मालमत्ता कर, वीज बिल, विमा व कर्जाचे हप्ते भरतात. वाहन शिकाऊ परवाना आणि पासपाेर्ट बनविण्यासाठी ऑनलाइन मुलाखतही व्यक्तिगत स्वरूपात सहज मिळविली जाते.