नागपुरात पोस्टर गँगची दहशत; गुन्हेगारी आणि फोटोसेशन व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:27 PM2020-07-18T12:27:38+5:302020-07-18T12:28:59+5:30

नागपुरात गेल्या महिनाभरात प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सय्यद या तिघांची गुन्हेगारी लागोपाठ उघड झाली आहे. सारखी कार्यशैली आणि फसवणुकीची एकसारखीच पद्धत या तिघांनी अंगीकारली होती.

Poster gang terror in Nagpur city; Crime and photosession viral | नागपुरात पोस्टर गँगची दहशत; गुन्हेगारी आणि फोटोसेशन व्हायरल

नागपुरात पोस्टर गँगची दहशत; गुन्हेगारी आणि फोटोसेशन व्हायरल

Next
ठळक मुद्देसर्वत्र खळबळ

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पोस्टर गँगची गुन्हेगारी उघड झाल्यानंतर त्यांनी विशिष्ट हेतूने करून घेतलेले अनेकांसोबतचे फोटोसेशन व्हायरल झाले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या व्हायरल झालेल्या फोटोसेशनमुळे अनेकांचा बीपीही वाढला आहे.

नागपुरात गेल्या महिनाभरात प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सय्यद या तिघांची गुन्हेगारी लागोपाठ उघड झाली आहे. सारखी कार्यशैली आणि फसवणुकीची एकसारखीच पद्धत या तिघांनी अंगीकारली होती. एकीकडे समाजातील विविध मान्यवरांशी ओळख वाढवून, त्यांच्या कार्यक्रमात जाऊन, त्यांच्यासोबत फोटो काढून घ्यायचे. हे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून चमकोगिरी करायची आणि याच फोटोच्या आधारे प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत सलगी वाढवून आपले कथित सामाजिक वजन वाढवून घ्यायचे. हे वजन असहाय, निराधार व्यक्तींवर टाकून त्यांच्या मालमत्ता हडप करायच्या, त्यांना ब्लॅकमेल करायचे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा धाक दाखवून पीडितांची मुस्कटदाबी करत कोट्यवधींची माया गोळा करायची, अशीच या तिघांची पद्धत होती.

नागपुरातच नव्हे, सर्वत्र प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सय्यद सारखे अनेक थंड डोक्याचे गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. गोरगरिबांची सेवा करण्याचा आव आणून ही मंडळी गोरगरिबांची पिळवणूक करीत आहे. आपले गुन्हेगारी साम्राज्य मोठे करण्यासाठी हे असले गुन्हेगार विविध पक्षांच्या नेत्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत घसट वाढवतात.

नेत्यांनी राहावे सावध
अनेकदा अशा गुन्हेगारांसोबत हस्तांदोलन करताना किंवा त्यांच्यासोबत फोटो काढून घेताना बहुतांश नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नसते. ओळखीच्यासोबत आल्यामुळे हा आपलाच असावा, असे समजून ते त्याच्यासोबत फोटो काढून घेतात आणि नंतर त्या फोटोंचा बागुलबुवा होतो. या फोटोंचा वापर हे असले गुन्हेगार आपली दहशत निर्माण करण्यासाठी करतात, हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नेत्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Poster gang terror in Nagpur city; Crime and photosession viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.