सिमेंट रोडचे पोस्टमार्टम

By admin | Published: May 2, 2017 01:28 AM2017-05-02T01:28:20+5:302017-05-02T01:28:20+5:30

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत.

Postmortem of Cement Road | सिमेंट रोडचे पोस्टमार्टम

सिमेंट रोडचे पोस्टमार्टम

Next

जनमंचचे पब्लिक आॅडिट : व्हीआयपी वेस्ट हायकोर्ट सिमेंट रोडचे काम निकृष्ट
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु या रोडची कामे निकृ ष्ट दर्जाची असल्याबाबत तक्रारींचा ओघ सुरू आहे. यातील तथ्य जाणून घेण्यासाठी जनमंचने सोमवारी व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या वेस्ट हायकोर्ट रोडवरील लॉ कॉलेज चौक ते जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान या दरम्यानच्या सिमेंट रोडची पाहणी केली. महिनाभरातच या रोडवर भेगा पडलेल्या आहेत. दुभाजक धक्क्याने पडते. फूटपाथ व पावसाळी नालीचे काम व्यवस्थित नाही. पावसाळ्यात रोडलगतच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यात पाणी शिरणार आहे. अशा अनेक त्रुटी आढळल्या. या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.
शहरातील काही निवडक सिमेंट रोडची शास्त्रशुद्ध तपासणी करण्याचा निर्णय जनमंचने घेतला आहे. त्यानुसार वेस्ट हायकोर्ट रोडवरील लॉ कॉलेज ते जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान या दरम्यानच्या रोडची पाहणी करण्यात आली. या सिमेंट रोडचे काम निकृष्ट झाले आहे. रोडचे पेव्हर ब्लॉक भरण्यासाठी पॉलिसल्फरचा वापर न करता डांबराचा वापर करण्यात आला आहे तसेच दुभाजकाचे काम निकृष्ट आहे. धक्का दिला तरी ते खाली पडतात. यात मलबा भरण्यात आलेला नाही. जुन्या पावसाळी नाल्यातील कचरा काढण्यात आलेला नाही. फूटपाथला लेव्हल नाही. खाली-वर असल्याने पादचाऱ्यांना याचा चालण्यासाठी उपयोग होणार नाही.
सिमेंट रोडला ३० वर्षे काहीही होणार नाही, असा दावा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात पाहणी केली असता महिनाभरातच ठिकठिकाणी रोडवरील गिट्टी निघाली आहे. रोडच्या कडेला असलेल्या झाडांना कठडे बनविण्यासाठी जुनेच दगड वापरण्यात आले आहेत. वास्तविक कंत्राटदाराने नवीन साहित्याचा वापर करणे अपेक्षित आहे.
महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे बंगले असलेल्या व्हीआयपी रोडची अशी अवस्था आहे तर शहरातील इतर रोडच्या कामांचा विचारच न केलेला बरा.
(पान १ वरून) यावेळी अ‍ॅड. अनिल किलोर यांच्यासह राम आकरे, कृ.द.दाभोळकर, शरद पाटील, प्रकाश इटनकर, किशोर गुल्हाने, नरेश शिरसाट, आशुतोष दाभोळकर, गणेश खर्चे, मिलिंद राऊ त, प्रकाश गौरकर, उत्तम सोळके, राजेश किलोर, श्रीकांत दौड, तात्या कांबळे, अमिताभ पावडे, सुधांशू मोहोड, मनोहर रडके, अशोक कामडी आदी उपस्थित होते.
लेडीज क्लब चौकात रोडला भेगा
जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याजवळील लेडीज क्लब चौकातील सिमेंट रोडला ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. ठिकठिकाणी गिट्टी बाहेर पडली आहे. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक नसतानाही भेगा पडल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते.
अहिंसा चौकातील रोड उखडला
वेस्ट हायकोर्ट रोडवरील अहिंसा चौकात नाल्यावर रोड बनविण्यात आला आहे. परंतु येथील रोडवरील गिट्टी उखडली आहे. तसेच येथील रोड समतल नाही. त्यामुळे लवकरच खड्डे पडण्याची शक्यता आहे. दुभाजकाचे काम व्यवस्थित नाही. ते सिमेंटने भरण्यात आलेले नाही.
न्यायाधीशांच्या बंगल्यात पाणी शिरण्याचा धोका
वेस्ट हायकोर्ट सिमेंट रोडवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासोबतच रेल्वे अधिकारी व न्यायाधीशांचे बंगले आहेत. पावसाचे पाणी नालीत जाईल अशा स्वरुपाचे रोडचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे पाणी रोडलगतच्या बंगल्यात शिरण्याच्या धोका आहे.
पावसाळी नालीत कचरा व गाळ
पावसाचे पाणी आजूबाजूच्या बंगल्यात शिरू नये यासाठी रोडलगत फुटपाथखाली पावसाळी नाल्या बनविण्यात आल्या आहेत. परंतु यातील कचरा व गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्या तुंबणार असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. अनेक ठिकाणी नाल्यांचे चेंबर उघडे असल्याने अपघात होण्याचा धोका आहे.
नुकसान झाले तर गुन्हे दाखल करू- अनिल किलोर
उपराजधानी स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. विकासाला आमचा विरोध नाही. विकास कामे स्मार्ट सिटीला साजेशी असावी. ती उत्तम दर्जाची व्हावी. महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आहेत. विकास कामे जनतेच्याच पैशातून होत आहेत. या पैशाचा सदुपयोग व्हावा. या हेतूने जनमंचने सिमेंट रोडचे पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज वेस्ट हायकोर्ट रोडची पाहणी करण्यात आली. यात ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असल्याचे आढळून आले. तसेच फुटपाथ व पावसाळी नाल्या व्यवस्थित नाही. पावसाचे पाणी बाजूच्या बंगल्यात शिरणार आहे. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले तर संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करू. तसेच नुकसान भरपाईचा दावा करू, असा इशारा जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी यावेळी दिला. या रोडवर आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान असूनही काम निकृष्ट होत असेल तर शहरातील इतर सिमेंट रोडची कामे कशी असतील, असा प्रश्न त्यांनी उपिस्थत केला. तपासणी संदर्भात महापालिकेला आधी कळविले होते परंतु एकही अधिकारी उपस्थित नव्हता. अन्य रोडची तपासणी करण्यापूर्वी महापालिकेला याची पूर्वकल्पना देणार असल्याचे किलोर म्हणाले.

झाडांना धोका
रोडलगतच्या झाडांच्या बुंध्याजवळ गट्टू लावून कठडे तयार करण्यात आले आहे. परंतु बांधकाम निकृष्ट असून बुंध्याजवळ माती भरण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात वाऱ्यामुळे झाडे कोलमडण्याची शक्यता आहे.

तर कंत्राटदारांचे बिल रोखणार
जनमंचने सिमेंट रोडच्या कामासंदर्भात तक्रार केली आहे. तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिमेंट रोडच्या कामाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार थर्ड पार्टी चौकशी करण्यात येईल. काम निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदाराचे बिल रोखण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अश्वीन मुदगल यांनी दिली.

अनेक त्रुटी आढळल्या
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. शहराचा विकास व्हावाच परंतु तो स्मार्ट सिटीला साजेसा असावा. सुरू असलेली विकास कामे उत्तम दर्जाची व्हावी. या हेतूने रखडलेले सिमेंट रोड व उत्तम दर्जाची काम होत नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. याची दखल घेत जनमंचने सिमेंट रोडचे पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वेस्ट हायकोर्ट रोडची सोमवारी पाहणी केली. यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या.
मनपाकडून परवानगी का नाही?
महापालिका आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून या पाहणीला सहकार्य करण्याची विनंती जनमंचने केली होती. परंतु महापालिकेचा कोणताही अधिकारी वा इंजिनिअर उपस्थित नव्हता. तसेच बांधकामाच्या दर्जाचे प्रयोगशाळेत शास्त्रशुद्ध परीक्षण करता यावे, यासाठी या रस्त्यावर सहा ठिकाणी २५० एमएम बाय १०० एमएम आकाराचे कोअर कटिंग्ज घेण्याची परवानगी मागतली होती. परंतु महापालिकेकडून ती देण्यात आलेली नाही.

सिमेंट रोडची थर्ड पार्टीमार्फत चौकशी : पालकमंत्री
वेस्ट हायकोर्ट सिमेंट रोडचे काम निकृष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु अद्याप काम सुरू आहे. ते पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराला अजून बिल देण्यात आलेले नाही. रोडची कामे उत्तम दर्जाची व्हावी, यासाठी कंत्राटदारांकडून सुधारणा अपेक्षित आहे. कामे उत्तम दर्जाची व्हावी. यासाठी महापालिका आयुक्त अश्वीन मुदगल यांना थर्ड पार्टीमार्फत कामाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. जनमंचतर्फे सिमेंट रोडची पाहणी सुरू असतानाच पालकमंत्र्यांनी आकस्मिक भेट दिली. त्यांनीही अहिंसा चौकातील रोडची प्रत्यक्ष पाहणी केली. रोडचे काम निकृष्ट झाल्याचे सकृतदर्शनी त्यांच्या निदर्शनास आले. शहरातील सर्व सिमेंट रोडची थर्ड पार्टीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई आहे. सिमेंट रोडला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे मे महिन्यात सिमेंट रोडची कामे थांबविण्यात आली आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Web Title: Postmortem of Cement Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.