रात्रीही होणार ‘पोस्टमॉर्टेम’

By admin | Published: February 6, 2017 02:12 AM2017-02-06T02:12:20+5:302017-02-06T02:12:20+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २४ तास शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) गृह सुरू ठेवण्यासाठी

'Postmortem' will be done at night | रात्रीही होणार ‘पोस्टमॉर्टेम’

रात्रीही होणार ‘पोस्टमॉर्टेम’

Next

मेडिकल : राज्यातील नागपूर मेडिकल हे पहिले ठरणार
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २४ तास शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) गृह सुरू ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेतला आहे. याची सुरुवात उद्या ६ फेब्रुवारीपासून होत आहे. परंतु पहिल्या टप्प्यात रात्री १० वाजेपर्यंत हे गृह सुरू ठेवले जाणार असून त्यासाठी आवश्यक सोयी न्यायवैद्यकशास्त्र विभागाला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व मेडिकल रुग्णालयाचे शवविच्छेदन गृह चौविसही तास सुरू ठेवण्याचा निर्णय २०१४ मध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला. परंतु दोन वर्षे होऊनही सायंकाळी ६ वाजेनंतर राज्यातील सर्व मेडिकल रुग्णालयाचे शवविच्छेदन गृह बंद व्हायचे. या संदर्भातील वृत्त ३ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने ‘२४ तास पोस्टमॉर्टेमला ना’ या मथळ्याखाली प्रकाशित केले. याची दखल नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतली. त्यांनी संबंधित विभागाला सोयी उपलब्ध करून देऊन रात्री शवविच्छेदन करण्याचे निर्देश दिले.
पूर्वीच्या काळी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. यामुळे दिवसाच्या प्रकाशातच शवविच्छेदन करण्याचा नियम होता. मात्र यामुळे आधीच दु:खात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईकांना अडचणीचे जात होते. हे लक्षात घेऊन तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चौविसही तास शवविच्छेदन गृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली. परंतु या निर्णयाला न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या अनेक डॉक्टरांनी अपुरे मनुष्यबळ हे कारण देत रात्रीचे शवविच्छेदन बंद ठेवले होते. एका पाळीमध्ये एक डॉक्टर दोन अटेन्डंट आणि एक तंत्रज्ञ अशा चार लोकांची चमू हवी असते. परंतु बहुसंख्य शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांसोबतच अटेन्डंट आणि तंत्रज्ञाची फारच कमी आहे. नागपूर मेडिकल रुग्णालयात केवळ चारच कर्मचारी आहेत.
यातही एका कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी व सकाळच्या पाळीत किमान तीन कर्मचारी आवश्यक असल्याने चौविस तास शवविच्छेदन गृह सुरू ठेवणे अडचणीचे जात होते. या समस्यांना ‘लोकमत’ने वाचा फोडली. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी शवविच्छेदन गृहात आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्यात. यात अद्यावत विद्युत दिव्यांची सोय, कर्मचारी व तंत्रज्ञाची संख्या वाढवली. यामुळे ६ फेब्रुवारीपासून रात्री ९ वाजेपर्यंत मृतदेह स्वीकारले जाणार आहे. यामुळे रात्री शवविच्छेदन करणारे राज्यातील नागपुरातील मेडिकल हे पहिले ठरणार आहे.(प्रतिनिधी)

-तूर्तास रात्री ९ वाजेपर्यंत मृतदेह स्वीकारले जातील
रात्री शवविच्छेदन करण्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु पहिल्या टप्प्यात रात्री ९ वाजेपर्यंत मृतदेह स्वीकारून रात्री १० वाजेपर्यंत शवविच्छेदन केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता शवविच्छेदनाला सुरुवात होईल. दुसऱ्या टप्प्यात मृताच्या नातेवाईकांची मागणी असेल तर रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल. या निर्णयामुळे मृताच्या नातेवाईकांवर शवविच्छेदनासाठी येणारी तासन्तास प्रतीक्षेची वेळ कमी होईल. विशेषत: बाहेरगावच्या लोकांना याचा फायदा मिळेल.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: 'Postmortem' will be done at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.