‘बीएड’च्या परीक्षा परत ‘पोस्टपोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:09 AM2021-02-25T04:09:05+5:302021-02-25T04:09:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे दुसऱ्यांदा परीक्षा ‘पोस्टपोन’ करावी लागली आहे. जी परीक्षा २०१९ च्या हिवाळ्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती आता कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
२०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली होती. मात्र, पहिला पेपर होताच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांची प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. त्यामुळे ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. आता नागपुरात येऊन परीक्षा कशी द्यायची व त्या कालावधीत रहायचे कुठे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला होता. कोरोनामुळे परीस्थिती नियंत्रित झाल्यावरच विद्यापीठाने परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली गेली व विद्यापीठानेदेखील परीक्षा पुढे ढकलली होती.
स्थिती सुधारत असल्याने विद्यापीठाने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुधारित वेळापत्रक जारी केले व २२ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात झाली. मात्र ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने विद्यापीठाने २४ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारे पेपर पुढील निर्देशांपर्यंत पुढे ढकलले आहेत. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी त्यासंदर्भातील अधिसूचनादेखील जारी केली आहे.
मनपाकडून विद्यापीठ प्रशासनाला फोन
बुधवारी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा ‘एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अॅन्ड कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स’ हा पेपर होता. विद्यार्थी पेपरसाठी परीक्षा केंद्रांवरदेखील पोहोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयच ‘कोरोना’मुळे ‘सील’ करण्यात आल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर हलविण्यासाठी विद्यापीठाने वाहनेदेखील पाठविली. मात्र मनपा प्रशासनाकडून विद्यापीठाला फोन गेला व परीक्षा घेतल्यास ‘कोरोना’च्या नियमावलीचा भंग ठरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.