कर्मचाऱ्यांसाठी लसींच्या दोन डोसचे बंधन स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:16+5:302021-08-14T04:13:16+5:30
नागपूर : लसींचे दोन डोस घेतल्याच्या १४ दिवसानंतरच विविध ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी राज्य सरकारने आदेशात दिली ...
नागपूर : लसींचे दोन डोस घेतल्याच्या १४ दिवसानंतरच विविध ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी राज्य सरकारने आदेशात दिली आहे. पण हे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी शक्य नसून त्यांच्यासाठी लसींच्या दोन डोसचे बंधन स्थगित करावे, अशा मागणीचे निवेदन नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनच्या (एनआयएचए) पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी जगदीश काटकर यांना दिले.
याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, उपाध्यक्ष डॉ. गणेश गुप्ता, सचिव दीपक खुराना उपस्थित होते. राज्य सरकारच्या आदेशानुसार रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, लॉन, बँक्वेट हॉल आदींसाठी व्यावसायिक वेळेचे निर्बंध १५ ऑगस्टपासून शिथिल केले आहे. पण आदेशात सर्व क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना लसींचे दोन डोस घेतल्याच्या तारखेपासून १४ दिवसानंतरच काम करण्याची परवानगी दिली आहे. वर्तमान स्थितीत ते शक्य नाही. कर्मचाऱ्यांच्या पूर्ण डोसची अट जानेवारी २०२२ पासून अनिवार्य करण्याची असोसिएशनने विनंती केली. या संदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पाठविले आहे.
रेणू म्हणाले, हॉटेल्समध्ये काम करणारे कर्मचारी, वेटर, रूम बॉय यांचे वय १८ ते ४५ दरम्यान असते. देशात या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण १ मेपासून सुरू करण्यात आले आहे. जागरूकतेचा अभाव आणि लस उपलब्ध नसल्याने जून महिन्यात पहिला डोस घेतल्यांना ऑगस्टअखेर दुसरा डोस मिळेल. अशा स्थितीत १४ दिवसांच्या कालावधीनंतर अर्थात १५ सप्टेंबरनंतर त्यांना कामावर जाण्याची परवानगी मिळेल.
दीपक खुराना म्हणाले, आदेशात वातानुकूलित रेस्टॉरंटच्या खिडक्या आणि दरवाजे खुले ठेवण्यास म्हटले आहे. स्टार श्रेणीतील रेस्टॉरंट आणि अनेक लहान युनिटने ग्राहकांना वातानाकुलित सुविधा देण्यासाठी खिडक्या बसविल्या नाहीत. त्यामुळे आदेशाचे पालन करणे कठीण होईल.
उपजिल्हाधिकारी काटकर म्हणाले, या मागण्यांसह राज्य सरकारच निर्णय घेऊ शकते. त्यामुळे हे निवेदन राज्य सरकारला पाठविण्यात येईल.