पोटा सर्वात मोठी तर सोनपूर सर्वात लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:07 AM2020-12-27T04:07:47+5:302020-12-27T04:07:47+5:30

नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधूमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ...

Pota is the largest and Sonpur is the smallest gram panchayat | पोटा सर्वात मोठी तर सोनपूर सर्वात लहान ग्रामपंचायत

पोटा सर्वात मोठी तर सोनपूर सर्वात लहान ग्रामपंचायत

googlenewsNext

नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधूमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ३० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता गावागावात पॅनेल निश्चित करणे सुरू झाले आहे. नागपूर जिल्ह्यात १७,११,९ आणि ७ सदस्य संख्या असलेल्या ग्रा.पं.ची संख्या मोठी आहे. यात निवडणूक होऊ घातलेल्या ग्रा.पं.मध्ये सावनेर तालुक्यातील पोटा (चणकापूर), कामठी तालुक्यातील कोराडी, आणि नागपूर ग्रा. तालुक्यातील दवलामेटी या मोठ्या ग्रा.पं. आहे. येथील सदस्य संख्या प्रत्येकी १७ इतकी आहे. यासोबतच ७ सदस्य संख्या असलेल्या ग्रा.पं.ची संख्या अधिक आहे. यात सावनेर तालुक्यात सोनपूर (मतदार संख्येच्या तुलनेत) ही सर्वात लहान ग्रा.पं. आहे. जिल्ह्यात ग्रा.पं.च्या निवडणुका एकसंघ होऊन लढण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे. इकडे गावागावात विजय पताका फडकविण्याची तयारी भाजपने चालविली आहे. त्यामुळे बहुतांश ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच समाना रंगणार आहे. गतवेळी पोटा ग्रा.पं. मध्ये कोणत्याही गटाकडे बहुमत नव्हते. त्यामुळे सत्ता स्थापनेत अपक्षाची भूमिका महत्वाची राहीली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील यशानंतर येथे काॅंग्रेसची ताकद वाढली आहे. मात्र काॅंग्रेसला शह देण्यासाठी भाजपने पुन्हा दंड थोपाटले आहे. ६ चा प्रभाग असलेली कोराडी ग्रा.पं.ही जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्वाची आहे. कोराडी हे भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांचे होम टाऊन आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या दमदार यशानंतर यावेळी कोराडीवर काॅंग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. काॅंग्रेसचे जि.प.सदस्य नाना कंभाले यांनी कोराडीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. याला महाविकास आघाडीचे बळ आहे. मात्र आजवरच अनुभव लक्षात घेता कोराडीचा पाॅवरफुल सामना लढताना टीम कंभाले यांना तो अधिक दक्ष राहून लढावा लागणार आहे. लहान ग्रा.पं.चा विचार करता रामटेक तालुक्यात मानापूर व भोजापूर ही गावे मिळून मानापूर ग्रा.पं. तयार झाली आहे. याअगोदर ही ग्रा.पं. काॅंग्रेसच्या ताब्यात होती. येथे काॅंग्रेसचे महासचिव याही वेळी ताकदीनिशी मैदानात उतरले आहे. हा तालुका सेनेचा गड असला तरी यावेळी ग्रा.पं. निवडणूक काॅंग्रेस येथे महाविकास आघाडीची ताकद किती कॅश करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक २५ ग्रा.पं.साठी कुही तालुक्यात निवडणूक होत आहे. यात ११ सदस्य असलेली तारणा ही सर्वात मोठी तर ७ सदस्य असलेली राजोली ही सर्वात लहान ग्रा.पं. आहे. तालुक्यात काॅंग्रेस विरुद्ध भाजपा असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.

उमरेड तालुक्यात १४ ग्रा.पं.ची निवडणूक होत आहे. यामध्ये नवेगाव साधु ही ग्रामपंचायत सर्वात मोठी असून याठिकाणी ११ सदस्यांची निवड मतदानाच्या माध्यमातून होईल. तालुक्यातील किन्हाळा, शेडेश्वर, सावंगी (खुर्द), कळमना (बेला), सालईराणी, खैरी (बुटी) या सर्व सहा ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी सात सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.

काटोल तालुक्यात तीन ग्रा.पं.साठी निवडणूक होत आहे. यात ९ सदस्य असलेले मा‌ळेगाव ही मोठी तर ७ सदस्य असलेली भोरगड ही लहान ग्रा.पं. आहे. कळमेश्वर तालुक्यात ११ सदस्य असलेली कोहळी ही मोठी तर ९ सदस्य असलेली सोनपूर ह लहान ग्रा.पं. आहे. नरखेड तालुक्यात १७ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. भिवापूर तालुक्यात निवडणूक होऊ घातलेल्या तिन्ही ग्रा.पं.ची सदस्य संख्या प्रत्येकी ९ इतकी आहे. हिंगणा तालुक्यात ५ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. यात सातगाव वेणानगर ही मोठी ग्रा.पं. आहे. येथे ५ प्रभागातून १५ सदस्य निवडायचे आहेत. सर्वात लहान ग्रामपंचायत सावंगी आसोला असून येथे तीन प्रभागातून ९ सदस्य निवडून द्यायचे आहे.

सावनेर तालुक्यात १२ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. येथे पोटा ही मोठी ग्रा.पं आहे. ११,५५४ मतदार असलेल्या या ग्रा.पं.मध्ये १७ सदस्यांची निवड होईल. तालुक्यात सोनपूर ही लहान ग्रा.पं. आहे. येथे ७ सदस्यांची निवड होईल. तालुक्यात काॅंग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना होईल.

Web Title: Pota is the largest and Sonpur is the smallest gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.