थकबाकीदारांची वीज कापली, चोरीही पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:21+5:302021-06-25T04:07:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून महावितरणने सुद्धा थकबाकीदारांविरुद्धची कारवाई पुन्हा सुरू केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून महावितरणने सुद्धा थकबाकीदारांविरुद्धची कारवाई पुन्हा सुरू केली आहे. थकबाकीदारांनी बिल न भरल्यास त्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. या दरम्यान वीज चोरीचीही तपासणी केली जात आहे.
या अंतर्गत गुरुवारी महाल डिव्हीजनमध्ये तुळशीबाग उपविभागात वीज बिल वसुली व चोरी पकडण्याची मोहीम चालविण्यात आली. महाल येथील किल्ला परिसर, दसरा रोड आदी परिसरात पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. दरम्यान ४.४६ लाख रुपये थकीत असलेल्या १० ग्राहकांचे वीज कनेक्शन तात्पुरते आणि २१.९७ लाख रुपये थकबाकी असलेल्या १४ ग्राहकांचे कनेक्शन कायमचे कापण्यात आले. यावेळी तीन ग्राहकांनी कारवाईपासून वाचण्यासाठी १,०२,००० रुपयाचा भरणा केला. मोहिमेदरम्यान दोन ठिकाणी वीज चोरीही पकडण्यात आली. त्यांच्याविरुद्द कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी प्रादेशिक संचालक रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या मोहिमेत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता सहभागी झाले हाेते. कोतवाली पोलीस ठाण्याचे पथकही मदतीला होते.
कनेक्शन कापल्याने कर्मचाऱ्यांना मारहाण
वीज कनेक्शन कापल्याने संतापलेल्या ग्राहकांनी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकारही समोर आला आहे. महावितरणने आरोपीविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोधनी रोड येथील रहिवासी रामू गावंडे यांनी विजेची थकबाकी न भरल्याने २० जून रोजी त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले होते. गुरुवारी मानकापूर वितरण केंद्राजवळ कार्यरत महिला कर्मचारी सहारे आणि कंत्राटी कर्मचारी शिवणकर हे गोधनी रोडवर काम करीत होते. तेव्हा वेलकम सोसायटीजवळ गावंडे व त्याच्या मुलाने अन्य एका व्यक्तीच्या मदतीने कर्मचाऱ्यांना रोखले व मारहाण केली असा आरोप आहे.