सत्ता आली पण कार्यकर्त्यांचे काय ?
By admin | Published: June 21, 2015 02:51 AM2015-06-21T02:51:33+5:302015-06-21T02:51:33+5:30
भाजपचे संघर्षाचे दिवस गेले. सत्तेचे ‘अच्छे दिन आले’. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आली.
भाजप शहर कार्यकारिणीची आज बैठक
कमलेश वानखेडे नागपूर
भाजपचे संघर्षाचे दिवस गेले. सत्तेचे ‘अच्छे दिन आले’. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आली. पक्षाचा झेंडा खाद्यांवर घेऊन फिरणारा सामान्य कार्यकर्ता खरच समाधानी आहे का, त्याची चार कामे होत आहेत का, की कार्यकर्त्यांच्या नावावर एजंटांची कामे होत आहेत ? पक्षासाठी चटई उचलणारे वंचित अन ‘चटई क्षेत्र’वाले लाभार्थी असे तर होत नाही ना ! लाट पाहून पक्षात आलेल्यांना समोरची खुर्ची अन पडत्या काळात अनेक लाटांना सामोरे जाणारा कार्यकर्ता मागे गर्दीत चेपला जात आहे. यावर नेत्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सामान्य कार्यकर्ता पक्षापासून तुटला, दुखावला, दुरावला तर भाजपचीही काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही.
तब्बल वर्षभरानंतर भाजपाच्या शहर कार्यकारिणीची बैठक आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता हनुमान नगरातील संत रविदास सभागृहात होत आहे. तसे तर शहर कार्यकारिणीची बैठक तीन महिन्यातून एकदा होणे अपेक्षित आहे. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची धामधूम व त्यांनतर पक्षाने दिलेले कार्यक्रम राबविताना कदाचित शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांना कार्यकारिणी घेण्यासाठी पुरेसी सवड मिळाली नसेल. कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने का होईना, सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. गेली १५ वर्षे भाजप राज्यात, केंद्रात सत्तेत नव्हती. त्या वेळी या कार्यकर्त्यांनी पक्षाकडून कसलीही अपेक्षा केली नाही.पराभव पचवित पुन्हा नव्या दमाने पक्षाचा झेंडा उंचावून धरण्याचे काम केले. विरोधकांचे नारे ऐकून ते खचले नाहीत. आता खालून वरपर्यंत सत्ता आहे. पण या सत्तेसाठी झटणारा कार्यकर्ता मनातून खूश आहे का, नेत्यांकडून त्याची आस्थेने विचारणा होत आहे का, की तोच पक्षासाठी अनोळखी ठरू लागला आहे, या सर्व प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. सत्तेचा हा काळ कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणारा ठरेल की फक्त निवडक खुशमस्कऱ्यांची झोळी भरणारा यावरही विचार करावा लागेल.
एकवेळ गडकरी, फडणवीस गर्दीत दिसलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याकडे पाहून स्मितहास्य करतात. जमलेच तर हात दाखवतात. नेत्यांकडून दाखविली जाणारी एवढी ओळखही कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरते. एक वेगळेच समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकते. पण शहर व जिल्ह्यातील काही आमदार तर जवळून जाणाऱ्या कार्यकर्त्याला विचारायलाही तयार नाही. काही नगरसेवक तर मंत्र्यांसारखे वागतात. घरी अडचणी घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावतात. नेत्यांना डोक्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्याची अशीच घुसमट होत राहिली तर तब्बल ११ आमदारांची टीम निवडून देणाऱ्या कार्यकर्त्यांना एकएकाला ‘आऊट’ करायला आणि महापालिकेतही सत्तेपासून खाली खेचायला वेळ लागणार नाही.