काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:16 AM2018-11-24T01:16:37+5:302018-11-24T01:18:10+5:30
काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून आहे. दलित मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेवर येत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून आहे. दलित मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेवर येत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
डॉ. ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी अध्यक्षस्थानी तर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.स. जोग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, रिपाईचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर व माजी आमदार अनिल गोंडाने व्यासपीठावर उपस्थित होते.
आपण मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करीत असल्याचा आरोप होतो. त्यात काहीच तथ्य नाही. दलित समाजाच्या भल्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. मी कुणाच्याही भूलथापांना बळी पडणारा माणूस नाही. समाजाच्या अधिकारांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे असे आठवले यांनी पुढे बोलताना सांगितले. तसेच, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व ज्योती लांजेवार यांचे साहित्य यावरही विस्तृत मार्गदर्शन केले.
थोरात यांनी दलित साहित्याचे महत्त्व समजावून सांगितले. दलित साहित्य भव्य असून त्याचा सर्वत्र विस्तार झाला आहे. आज सर्वच भाषांतील साहित्यावर दलित साहित्याचा प्रभाव दिसून येतो. या साहित्याने अदृश्य असणाऱ्या समाजाला दृश्य केले. ज्योती लांजेवार यांनीही आपल्या साहित्यातून दलित समाजाच्या वेदना बाहेर काढल्या असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्योती लांजेवार यांना स्वत:च्या समाजातूनच भरपूर आघात सहन करावे लागले होते. असे असले तरी त्यासंदर्भातील कटुता त्यांनी साहित्यात उमटू दिली नाही असे गांधी यांनी सांगितले. याप्रसंगी आठवले यांच्या हस्ते ‘वादळ उठणार आहे’ या काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले. ज्योती लांजेवार यांच्या कवितांचे संकलन या पुस्तकात आहे. जोग यांनी हा काव्यसंग्रह दलित समाज व दलित साहित्याची समीक्षा असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. अपर्णा लांजेवार-बोस यांनी प्रास्ताविक, प्रा. डॉ. अजय चिकाटे यांनी संचालन तर, महेंद्र गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.
मंदिर बनावे न्यायालयाच्या निर्णयातून
राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्धव ठाकरे मंदिरासाठी महासभा घेणार आहेत. संतांनी सरकारवर दबाव वाढविला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरासाठी हुंकार दिला आहे. कायदा कुणी हाती घेऊ नये, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. हे सरकार सर्वच जाती धर्माचे असल्याने न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सरकारने निर्णय घ्यावा, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.
रविभवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत राम मंदिराच्या मुद्यावर बोलत होते. न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच अध्यादेश काढणे अडचणीचे ठरेल, असे ते म्हणाले. राम मंदिराच्या जागेवर हिंदू, मुस्लीम आणि बौद्ध समाजानेही दावा केला आहे. त्यामुळे सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पाच राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, तीन राज्यात १०० टक्के भाजप सरकार येईल. राजस्थानमध्ये काटे की टक्क र राहणार असल्याचे ते म्हणाले. रिपाइंचा २० जानेवारीला विदर्भस्तरीय मेळावा नागपुरात होणार आहे. या मेळाव्यात स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेण्यात येणार असल्याचे सांगितले.