२३ पासून वीजग्राहक मेळावे : महावितरण साधणार नागरिकांशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 09:34 PM2019-07-20T21:34:40+5:302019-07-20T21:35:33+5:30
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर परिमंडळ अंतर्गत सर्व उपविभाग कार्यालयांमध्ये वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिले आहेत. येत्या २३ जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर परिमंडळ अंतर्गत सर्व उपविभाग कार्यालयांमध्ये वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिले आहेत. येत्या २३ जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काँग्रेसनगर या विभागांतर्गत असलेल्या उपविभागीय कार्यालयांमध्ये २३ जुलैपासून दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबिल दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील.
काँग्रेसनगर विभागांतर्गत येणाऱ्या हुडकेश्वर उपविभागातील खरबी वितरण केंद्रातील मेळावा २३ जुलै रोजी ३३ के.व्ही.वीज उपकेंद्रात, हुडकेश्वर वितरण केंद्रातील मेळावा २५ जुलै रोजी पिपळा ग्राम पंचायत कार्यालय, बेसा वितरण केंद्रातील मेळावा त्याच ठिकाणी २६ जुलै रोजी होणार आहे. त्रिमूर्तीनगर उप विभागातील मेळावा भगवती सभागृहात २५ जुलै रोजी तर शंकरनगर उपविभागातील मेळावा राणी लक्ष्मीबाई सभागृहात २६ जुलै रोजी होणार आहे. रिजन्ट उपविभागातील वीज ग्राहकांचा मेळावा साईकृपा मंगल कार्यालय येथे २९ जुलै रोजी होईल.
उमरेड विभागातील पाचगाव येथे २३ जुलै रोजी मेळावा होणार आहे. उमरेड तालुक्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी २५ जुलै रोजी उमरेड येथे, ३१ जुलै रोजी सिर्सीला आणि ३ ऑगस्ट रोजी बेला येथे मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. २४ जुलै रोजी कुही उपविभागात येणाऱ्या मांढळ येथे ३० जुलै रोजी तर वेलतूर येथे २ ऑगस्ट रोजी मेळावा होणार आहे. भिवापूर उपविभागातील वीज ग्राहकांच्या मेळावा २६ जुलै रोजी होईल. याच उपविभागात येणाऱ्या जावळी येथे १ ऑगस्ट, नांद येथे २९ जुलै रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य अभियंता दिलीप घुगल तसेच अधीक्षक अभियंता दिलीप दोडके हे स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधतील.