युक्रेन युद्धामुळे विजेचे संकट; अमोनियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे कोळसा टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 07:30 AM2022-03-01T07:30:00+5:302022-03-01T07:30:02+5:30
Nagpur News रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. याचा परिणाम आता भारतावरही पडू लागला आहे. महाराष्ट्रात विजेचे संकट उभे ठाकले आहे.
कमल शर्मा
नागपूर : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. याचा परिणाम आता भारतावरही पडू लागला आहे. महाराष्ट्रात विजेचे संकट उभे ठाकले आहे. भुसावळ व परळी वीज केंद्रातील प्रत्येकी एक युनिट कोळशाच्या टंचाईमुळे ठप्प पडले आहे. खापरखेडा व चंद्रपूर सोडून इतर केंद्रांमध्ये काेळशाची स्थिती चिंता वाढवणारी आहे.
उन्हाळा जाणवू लागताच राज्यात विजेची मागणी २३ हजार मेगावॉटच्या वर पोहोचली आहे. दुसरीकडे वीज केंद्र कोळशाच्या टंचाईमुळे ऑक्सिजनवर आहेत. महाजेनको व वेकोलिचे अधिकारी यासाठी रशिया-युक्रेन युद्धाला जबाबदार धरत आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, कोळसा उत्खननासाठी खाणींमध्ये स्फोट करावा लागतो. यासाठी अमोनियम नायट्रेटची आवश्यकता आहे. ते सीएनजीद्वारा उत्पादित केले जाते. बहुतांश गॅसचा पुरवठा हा रशियावरून होतो. परंतु सध्या युद्धामुळे पुरवठा प्रभावित झाला आहे. स्फोटकांच्या कमतरतेमुळे वीज केंद्र अगोदरच कोळशाच्या टंचाईने त्रस्त होते. युद्धामुळे पुरवठा प्रभावित झाल्याने हे संकट आणखी वाढले आहे.
- खासगी वीज केंद्रांमध्येही टंचाई
सरकारी वीज केंद्रांसोबतच खासगी वीज केंद्रांमध्येही कोळसा संकट निर्माण झाले आहे. महावितरणला वीज पुरवठा करणारी सीजीपीएल प्रकल्पातील चार युनिट याच कारणामुळे बंद पडली आहेत. राज्याला लोडशेडिंगपासून वाचवण्यासाठी जलविद्युत प्रकल्पांचे उत्पादन ११८३ मेगावॉटपर्यंत वाढवण्यात आले आहे. पॉवर एक्सचेंजकडूनही १३०० मेगावॉट वीज महागड्या दरावर खरेदी करण्यात आली आहे.
-ऊर्जा, रेल्वे व कोळसा मंत्रालय झाले सक्रिय
कोळशाच्या टंचाईमुळे निर्माण होणाऱ्या वीज संकटाबाबत केंद्र सरकार सक्रिय झाली आहे. ऊर्जा, रेल्वे आणि कोळसा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. महाजेनकोचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले हाेते.