राज्यातील वीज संकट तात्पुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:37 AM2017-10-07T01:37:08+5:302017-10-07T01:37:26+5:30

महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण झाल्याची बाब ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्वत: स्वीकारली.

 The power crisis of the state temporarily | राज्यातील वीज संकट तात्पुरते

राज्यातील वीज संकट तात्पुरते

Next
ठळक मुद्देऊर्जामंत्री बावनकुळे : १५ दिवसात परिस्थिती सुधारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण झाल्याची बाब ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्वत: स्वीकारली. हे केवळ १५ दिवसाचे तात्पुरते वीज संकट असून नागरिकांनी आंदोलन न करता विजेची बचत करावी, असे आवाहनही केले. तसेच दिवाळीच्या पाच दिवसात भारनियमन होणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.
राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी यावेळी वीज कंपन्यांची पाठराखण करीत कोळशाच्या कमतरतेमुळे हे संकट ओढवल्याचे सांगितले. तसेच यासाठी पाऊस जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता निर्माण झाली आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात भारनियमन केले जात आहेत. महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्राची एकूण क्षमता ९९०० मेगावॉट इतकी आहे. परंतु सध्या ४९८० मेगावॉट वीज तयार होत आहे. त्याच प्रकारे अडाणी प्रकल्पातून ३ हजार मेगावॉटपैकी केवळ १७५० मेगावॉट वीज मिळत आहे. पॉवर एक्सचेंजमधून ७०० मेगावॉट वीज घेतल्यानंतरही विजेची कमतरता भरून निघत नाही. ओपन मार्केटमध्येसुद्धा वीज उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी वीज उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे. विजेच्या बचतीने ही समस्या थोडी कमी होऊ शकते. नागरिकांनी आंदोलनाऐवजी वीज वाचवण्यावर अधिक भर द्यावा, दोन पंख्याऐवजी केवळ एकच पंखा वापरावा. एसीचा उपयोगही कमी करावा. स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा योजना व सरकारी कार्यालयात कमीत कमी विजेचा वापर करावा. पत्रपरिषदेला आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महावितरणचे नागपूरचे मुख्य अभियंता शेख उपस्थित होते.
पीयूष गोयल यांच्याशी चर्चा
ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, विजेच्या कमतरतेबाबत शनिवारी मुंबईत कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा कोळसा मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. स्वत: त्यांनी वेकोलिशी चर्चा करून रॅक वाढवून घेण्यास यश मिळविले. पुलिंग योजनेंंतर्गत खासगी केंद्राला महाजेनकोचा कोळसा देण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. रस्ते मार्गाने कोळसा वाहतुकीवर भर दिला जात आहे. वीज केंद्रांपर्यंत पाईप कन्व्हेयर बेल्ट लावून खाणीमधून कोळसा थेट वीज केंद्रापर्यंत आणण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  The power crisis of the state temporarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.