नागपुरात उपद्रव शोध पथकाला मिळणार अतिक्रमण हटविण्याचा अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:40 PM2017-12-07T23:40:10+5:302017-12-07T23:44:39+5:30
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात घाण करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी उपद्रव शोधपथक गठित करण्यात आले आहे. या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडे करण्याचा निर्णय गुरुवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात घाण करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी उपद्रव शोधपथक गठित करण्यात आले आहे. पथकात ८७ माजी सैनिकांचा समावेश असून यातील ४४ जवान रुजू झाले आहेत. या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडे करण्याचा निर्णय गुरुवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
समितीचे सभापती मनोज चाफले, उपसभापती प्रमोद कौरती, सदस्य लखन येरावार, भावना लोणारे, वंदना चांदेकर,मनोज सांगोळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग विभागप्रमुख जयश्री थोट आदी उपस्थित होते.
कनक रिसोर्स मॅनेजमेंट कंपनीला दिलेल्या कंत्राटाबद्दल चर्चा करण्यात आली. कचरा उचलण्याच्या कामावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मनोज सांगोळे यांनी प्रभागातील स्वच्छता कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. आरोग्य विभागात कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दासरवार यांनी दिली.
महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर्सचे वेळापत्रक, रुग्णालयाची वेळ असलेला फलक दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. हिवताप व हत्तीरोग विभागाला डासांचा प्रार्दुभाव असलेल्या भागात फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी झोन अधिकारी उपस्थित होते.