नागपुरातील पॉवर लिफ्टर अल्फियाचे बॉडी बिल्डिंगमध्येही सुवर्णयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:24 PM2018-09-03T21:24:11+5:302018-09-03T21:28:51+5:30
पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धेत दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविण्यासह इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३६ सुवर्णपदक मिळविलेल्या नागपूरच्या अल्फिया हारून शेख या तरुणीने आता बॉडी बिल्डिंग (शरीर सौष्ठव) फिटनेसच्या प्रकारातही दमदार एन्ट्री केली आहे. अल्फियाने आपल्या पहिल्याच स्पर्धेत स्वत:च्या फिटनेसचे प्रदर्शन करीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धेत दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविण्यासह इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३६ सुवर्णपदक मिळविलेल्या नागपूरच्या अल्फिया हारून शेख या तरुणीने आता बॉडी बिल्डिंग (शरीर सौष्ठव) फिटनेसच्या प्रकारातही दमदार एन्ट्री केली आहे. अल्फियाने आपल्या पहिल्याच स्पर्धेत स्वत:च्या फिटनेसचे प्रदर्शन करीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
खरं तर बॉडी बिल्डिंगची आवड तिला लहानपणापासूनच होती. त्यामुळे वडिलांनीही तिला पॉवर लिफ्टिंग खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले व तिनेही त्यांच्या प्रोत्साहनाचे चीज करीत या खेळामध्ये नावलौकिक प्राप्त केला. घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करीत या मुलीने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. विश्वविक्रम नोंदविण्यासह दोनदा वर्ल्ड चॅम्पियन, ३६ सुवर्ण आणि इतर अनेक पदकांची कमाई करीत अल्फियाने स्वत:ला सिद्ध केले. यादरम्यान अल्फियाला बॉडी बिल्डिंग स्पर्धेचेही स्वप्न खुणावू लागले होते. मात्र या क्षेत्राकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन पाहता तिने वडिलांना इच्छा व्यक्त करीत परवानगी मागितली. मुलीच्या ध्येयामागे ठामपणे उभे असलेल्या हारून शरीफ शेख यांनीही तिला प्रोत्साहित केले. परवानगी तर मिळाली पण पुढे मार्ग कठीण होता. अल्फि याने फिट फॅक्टरचा नॅशनल चॅम्पियन राहिलेल्या नागपूरच्याच कांतीश हाडके यांची कोच म्हणून निवड केली. त्यांनीही तिला मोलाचे मार्गदर्शन केले. पॉवर लिफ्टिंग खेळासाठी प्रोटिनयुक्त आणि अधिक जेवणाला महत्त्व असते. मात्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेची तयारी करताना तिला फॅटयुक्त आहारावर आणि सर्वच गोष्टीवर नियंत्रण ठेवावे लागले. एवढेच नाही तर पाणीही तोलून मापून घ्यायचे होते. तीन महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर तिच्या शरीरात आवश्यक तो बदल केला.
हे सर्व परिश्रम करून ती बंगलोर येथे झालेल्या रिजनल फिट फॅक्टर स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत देशभरातील १७ मुलींनी सहभाग घेतला होता. मात्र अल्फियाने पिळदार शरीरयष्टीच्या तंतोतंत कलाकृतींचे प्रदर्शन करीत प्रेक्षक आणि परीक्षकांचीही मने जिंकली. तिच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने या स्पर्धेच्या सुवर्णपदकावर तिचे नाव कोरले गेले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने तिचा उत्साहही दुणावला आहे. जानेवारीमध्ये मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही हे यश सिद्ध करण्याचा विश्वास तिने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
हा दृष्टिकोन बदलायचा आहे
शरीर सौष्ठव स्पर्धा म्हटली की सहजच पिळदार शरीरयष्टी असलेले, पोटाच्या सिक्स पॅक अॅब्स, अतिशय ताठ झालेल्या मसल्सची तंतोतंत कलाकृती दाखविणारे पुरुष आपल्या डोळ्यासमोर येतात. खरं तर हे क्षेत्र कायम पुरुषांची मक्तेदारी असलेले राहिले आहे. एकतर या क्षेत्रात महिला आहेतच नाहीत किंवा असल्याही तरी बोटावर मोजण्याइतक्या आहेत, ज्यांची फार ओळख नाही. विदेशात महिलांचा याकडे कल वाढला असला तरी किमान भारतात तरी सध्या हीच अवस्था आहे. पिळदार शरीरयष्टी म्हणजे पुरुषांचे सौंदर्य आणि नाजुकता म्हणजे महिलांचे सौंदर्य या रूढ विचारानेही या क्षेत्राकडे महिला येण्यास तयार नाहीत. हीच मानसिकता समाजातही दिसून येत असल्याने या क्षेत्रात येणाऱ्या मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. अल्फियाने मात्र या सर्व रुढ मानसिकतेला आव्हान देत शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये पाऊल ठेवले. या स्पर्धेत सहभागी होऊनही मुलगी म्हणून सौंदर्य कसे राखले जाऊ शकते, हेच तिने सिद्ध केले आहे. कुणाला आव्हान द्यायचे नाही, मात्र कोणत्याही खेळांप्रती महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.