बाेरगाव परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:40+5:302021-05-09T04:09:40+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ...

Power outage in Baergaon area | बाेरगाव परिसरात विजेचा लपंडाव

बाेरगाव परिसरात विजेचा लपंडाव

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ही नित्याची बाब झाली आहे. या गावांमध्ये नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते. गरमीमुळे घरातील लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्रास हाेत असल्याने ही समस्या साेडविण्याची मागणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.

बाेरगाव फिडर अंतर्गत माैदा तालुक्यातील धानला, चिचाेली, बाेरगाव, मांगली (तेली), चारभा, पिपरी, खंडाळा, वीरशी, रेवराल व सुंदरगाव या गावांचा समावेश असून, या सर्व गावांमध्ये मागील २० दिवसापासून विजेच्या सततच्या लपंडावाची समस्या असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हवा जाेरात वाहायला सुरुवात झाल्यास किंवा पावसाची हलकी सर काेसळल्यास या गावांमधील वीजपुरवठा लगेच खंडित हाेताे. ताे पूर्ववत करण्यासाठी लाईनमन अथवा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी फाेनवर संपर्क साधल्यास ते कधीच प्रतिसाद देत नाहीत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते.

दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना रात्रभर गरमीत झाेपावे लागते. गरमीमुळे लहान मुलांना झाेप येत नसल्याने आई अथवा आजीला त्यांना पदराने हवा घालावी लागते, शिवाय डासांचा त्रासही सहन करावा लागताे. त्यामुळे त्यांना मलेरिया व तत्सम आजार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, ही समस्या नेमकी का उद्भवते याचा शाेध घेत ती साेडविण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी तसदी घेत नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ते या समस्येकडे गांभीर्याने बघत नाहीत.

काेराेना संक्रमण काळात नागरिकांच्या आराेग्याचा विचार करता, ही समस्या तातडीने साेडवावी, अशी मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, वीरशीचे सरपंच किसना करडभाजने, पिपरीचे उपसरपंच चक्रधर गभणे, मांगलीच्या सरपंच अनसूया खंडारे, धानल्याच्या सरपंच वनिता वैद्य, मांगलीचे माजी सरपंच रवींद्र फटिंग, प्रकाश तातेने यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

अवाजवी बिले

महावितरण कंपनीच्यावतीने विजेची बिले नियमित पाठविली जात असून, ती वसूलही केली जातात. बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा तातडीने खंडित केला जाताे. तुलनेत महावितरण कंपनी ग्राहकांना काेणतीही प्रभावी सेवा देत नाही. उलट अवाजवी बिलांची आकारणी करून ती बिले वसूल केली जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. विजेच्या लपंडावाची समस्या आपण महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अविनाश तांडेकर यांना सांगितली असता, नेहमीच वीजपुरवठा खंडित हाेण्याचे कारण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याची माहिती या भागातील सरपंचांनी दिली.

...

बाेरगाव फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमधील वीजपुरवठा काही कारणांमुळे खंडित हाेताे. याचे कारण शाेधून ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा नियमित सुरू राहिल.

रुपेश टेंभुर्णे, उपविभागीय अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.

Web Title: Power outage in Baergaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.